कोकण

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील साळशी, चाफेड, कुवळे गावात गव्यांचा मुक्त संचार; परिसरात घबराट

दिनेश चोरगे

शिरगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गव्यांची संख्या वाढत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील चाफेड, साळशी, कुवळे या परिसरातील जंगलात गेल्या काही दिवसांपासून गव्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे. या गव्यांचा रस्तावर मुक्त संचार असून परिसरातील नागरिकांसह वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काजू, आंबा बागायतींच्या बरोबरच भात शेतीचीही नासधूस होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तसेच दिवसाढवळ्या रानात फिरणे शेतकऱ्यांना धोक्याचे ठरत आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क साधूनही उपाययोजना केली जात नसल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फोंडाघाट, दाजीपूर अभयारण्यात गव्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. बेसुमार होणारी जंगलतोड यामुळे अन्नधान्याच्या शोधात या गाव्यांचे कळप तळकोकणात उतरले. उन्हाळ्यात आंबा, काजू बागायतीमध्ये मिळणारा खुराक, पावसाळ्यात माळरानावर वाढणारा चारा आणि लावणी केलेली भाताची शेती हे त्यांच्या सोयीचे खाद्य ठरले. यामुळे गव्यांनी सिंधुदुर्गात आपला मुक्काम कायम केला. सध्या शेतीची कामे आटोपली असली तरी शेतकरी आपल्या काजू बागायतीमध्ये साफसफाई, खत, मातीची भर देणे यांसारखी विविध कामे करताना अक्षरशः जीव मुठीत धरून काम करत आहे. साळशी आणि कुवळे दोन गावांना चाफेडमधून कणकवलीला जोडणारा २० किलोमीटरचा जवळचा मार्ग आहे. कामधंद्यानिमित्त दररोज या ठिकाणी दुचाकीस्वारांची मोठी वर्दळ असते. मागील तीन दिवसांपूर्वी साळशी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर साळस्कर हे आपल्या चारचाकी वाहनाने कणकवलीला जात असताना चाफेड गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक त्यांना सात ते आठ गव्यांचा कळप चरताना दिसला होता. याबाबत प्रभाकर साळस्कर यांनी संबंधित वनविभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे.

भरपाईपेक्षा उत्पादन खर्च जास्त

गव्यांकडून दरवर्षी शेतीचे नुकसान होत आहे. उत्पादन खर्चापेक्षा शासनाकडून मिळणारी भरपाई कमी असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.
प्रशांत प्रकाश घाडी, शेतकरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT