खेड; पुढारी वृत्तसेवा : लोटे औद्योगीक वसाहतीमधील ७५ उद्योजक अडचणीत सापडले आहेत. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाने (CETP) गाळ साचल्याचे कारण देत रासायनिक सांडपाणी प्रक्रियेसाठी घेण्यावर मर्यादा आणली आहे. त्यामुळे पर्यायाने उत्पादन प्रक्रियेवर मर्यादा आल्या आहेत.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र जल निसारण हा शासनाचा सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (CETP) आहे. या प्रकल्पातील टाक्या रासायनिक गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे रासायनिक सांडपाणी प्रक्रियेकरिता सभासद कारखान्यांमधून घेणे बंद केले आहे. यामुळे कारखानदारांच्या उत्पादनावर मर्यादा आल्याने अडचणीत सापडले आहेत. कोरोना साथीत तसेच आर्थिक मंदीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहान मोठ्या कंपन्यांना सीईटीपीच्या कारभारामुळे उत्पादनावर अप्रत्यक्ष मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आता या कंपन्यांना आणखी एका अडचणीवर मात करावी लागणार आहे.
लोटे ही सर्वात मोठी रासायनिक औद्योगिक वसाहत आहे. सामूहिक सांडपाणी प्रकल्पात म्हणजेच सीईटीपी मधील १० एमएलडी क्षमता असलेल्या प्रक्रिया प्लॅन्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याचे कारण देत रासायनिक सांडपाणी सोडण्यावर मर्यादा आल्या आहेत. एमआयडीसी मधील सुमारे ७४ हुन अधिक कंपन्यांचे येणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रियेसाठी घेणे सीईटीपी व्यवस्थापनाने बंद केले आहे . परिणामी कंपन्यांच्या उत्पादनावर मर्यादा आल्या असून, लवकरात लवकर सीईटीपी प्लॅन्ट मधील गाळ काढून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू न केल्यास कंपन्यांना आपले उत्पादन नाईलाजाने थांबवावे लागणार असल्याने लोटे येथील उद्योजक धास्तावले आहेत.
सीईटीपीच्या कारभारामुळे अनेक लघु व मध्यम कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे मंदीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्योजकांपुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. कारखाना बंद होण्याची टांगती तलवार असल्याचे लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा