खेड शहर; पुढारी वृत्तसेवा : खेड येथे उद्या (दि. १४) आमसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतील निमंत्रित मान्यवरांच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे दोघेही या आमसभेत एकाच व्यासपीठावर दिसतील अशी चर्चा सध्या जोरात आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच शिंदे गटाचे आमदार योगेश कदम आणि ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. खेड तालुका पंचायत समितीने आयोजित केलेल्या वार्षिक आमसभेच्या व्यासपीठावर हे दोन्ही नेते एकत्र येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये खेड तालुका विभागला गेला आहे. त्यामुळे खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व हे दोन आमदार करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत एकत्रित लढलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार योगेश कदम हे शिवसेना फुटल्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. आमदार योगेश कदम हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात सहभागी झाले; तर आमदार भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहिले. शिवसेना फुटीनंतर दोन्ही आमदारांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण आता एकमेकांवर टीका करणारे हेच दोन आमदार एकाच व्यासपीठावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खेड तालुका पंचायत समितीची वार्षिक आमसभा १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेला दोन्ही आमदारांना निमंत्रित केले आहे. तालुक्यातील विकासकामांवर चर्चा करण्यासाठी व मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राजकीय द्वेष बाजूला ठेवून हे दोन्ही आमदार एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. खेड तालुक्याच्या या आमसभेकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा