कोकण

समुद्र खवळला; अजस्त्र लाटांचा कोकण किनाऱ्याला तडाखा

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : बिपरजॉय वादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकले असले तरी वादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहेत. समुद्र खवळलेला असून पाण्याला मोठा करंट आला आहे. किनाऱ्यावर अजस्त्र लाटा धडकत आहेत. येथील मिया किनाऱ्यावर बंधाऱ्याचे काम सुरू असून अद्यापही ते पूर्ण झालेले नसल्याने येथील नागरिक पावसाळ्याच्या परिस्थितीचा विचार करुन आताच जीव मुठीत धरुन वास्तव्य करीत आहेत.

शुक्रवारी मध्यरात्री रत्नागिरीत पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र दिवसभर उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले होते. कोकण किनारपट्टीवर बिपरजॉय वादळ धडकण्याची शक्यता होती. परंतु खोल समुद्रातून वादळ पुढे सरकल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. पण या वादळाचा परिणाम किनारपट्टीवर मात्र जाणवत होता. मच्छीमारांनी आपल्या नौका बंदरात उभ्या केल्या आहेत. परंतु अजस्त्र लाटांच्या तडाख्यामुळे नौका बंदरातही हेलकावे खात होत्या.

शनिवारी दुपारनंतर जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे या स्थितीमुळे लाटा उसळण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. पाण्याला 'करंट' मारत होता. किनाऱ्यावर उभे राहिल्यावर पायाखालची वाळू लाटांबरोबर सरकत होती.. मिया किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर वेगाने लाटा धडकत होत्या. यावेळी किनारी भागात आवाजही धडकी भरवणारा होता. बंधाऱ्यामुळे उंच उसळणाऱ्या लाटा रोखल्या जात होत्या. परंतु पावसाळ्यात लाटांचे पाणी मानवी वस्तीत येण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

SCROLL FOR NEXT