रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षांपासून कोरोनाने धडकी भरवली होती. मध्यंतरी वर्षभर जिल्ह्यात कोरोनाची संख्या फारच कमी होती. आता मात्र ही संख्या वाढण्यास सुरूवात झाली असून सध्या 21 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असून नागरिकांनी गाफील राहू नये, आतापासून काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या माहे फेब्रुवारी 2023 पासून राज्यात व देशात वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कोव्हिड रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्तरावर सतर्कता बाळगणे आणि पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
या करिता जिल्हा टास्क फोर्स सभा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. सभेमध्ये राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे उपस्थित होते. तसेच जिह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी हे ऑनलाईन व्ही.सी.द्वारे उपस्थित होते.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पुढीललप्रमाणे मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाही करण्यातबाबत सूचित करण्यात आले. कोवीड अॅप्रोप्रिएट बिहेविअर (उदा. मास्क घालणे. सॅनिटायजरचा वापर करणे.), सामाजिक अंतर ठेवणे, साबण पाण्याने वरचेवर हात धुणे, लक्षणे जाणवल्यास तपासणी करून घेणे, ऑक्सिजन लेवल तपासणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यास अॅडमिट होणे, गर्दीची ठिकाणे टाळावीत, कोवीड व्हॅक्सिनचे राहिलेले डोस उपलब्ध झाल्यावर घेणेत यावे, आजार झाल्यास डॉक्टरांच्या सल्याने केाश खीेश्ररींळेप (गृहविलागीकरणामध्ये) राहावे, 60 वर्षावरील कोमोर्बीड रुग्ण उदा.हायपरटेन्शन, डायबेटीज, हृदयरोगी, तसेच क्रोनिक लंग/लिव्हर/किडनी चे आजारी रुग्ण, मेंदूचे आजारी रुग्ण यांनी प्राधान्याने गृहविलागीकरणामध्ये राहावे, गृहविलागीकरणासाठीचा रूम पूर्ण हवेशीर व खिडक्या उघड्या असणार्या असावा जेणेकरून हवा रूम मध्ये येईल.
राज्यासह देशभरात कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या एक्सबीबी 1.16 व्हेरिएंटचा संसर्ग पसरला तर चिंता वाढवू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आधीच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव तीन ते चार दिवसांतील उपचाराने कमी व्हायचा, परंतु या संसर्गाचा प्रादुर्भाव सात ते आठ दिवसांपर्यंत राहतो. त्यामुळे गाफील राहू नका, आतापासूनच काळजी घ्या, असा सल्लाही तज्ञांनी दिला आहे. पहिल्या दोन्ही लाटांतील रुग्णवाढीने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली होती. उन्हाळ्याच्या दिवसांत कोरोना अधिक सक्रिय होऊन संसर्गजन्य ठरतो. या मागील तीन वर्षाच्या अनुभवावरून यंदाच्या उन्हाळ्यात कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.
दरम्यान मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले असल्याने रुग्णवाढीचा आलेख पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत कमी राहील, असा आरोग्य तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, इतर आजार असलेल्यांसाठी नवा व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतो. इतरांनी देखील निष्काळजीपणा सोडून काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.