गडचिरोली : दावोस येथे अलीकडेच पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी मोठे करार झाल्यानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पातही लोह उद्योगासाठी भरीव तरतूद केली आहे. यामुळे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा भविष्यात स्टील हब होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला दावोस येथे झालेल्या परिषदेत गडचिरोली जिल्ह्यात लोह उद्योगासाठी 21 हजार 830 कोटी रुपयांचे सासंजस्य करार करण्यात आले. त्यातून 7 हजार 500 रोजगार निर्मिती होणार आहे. दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळे विणले जाणार आहे. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात 500 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने 3 वर्षांपूर्वी लोहखनिज उत्खनन सुरू केले. ते 10 दशलक्ष टनांवरून 60 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्यात येईल. शिवाय त्या भागातील हेडरी, बांडे व पुरसलगोंदी येथे नवे लोहप्रकल्प उभारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणीही घेतली आहे.
लॉयड मेटल्सच्या व्यतिरिक्त जेएसडब्लू या आघाडीच्या स्टील कंपनीनेही सुरजागड पहाडावर लीज मिळविली आहे. त्याविषयीची जनसुनावणी होणे बाकी आहे. कोरची तालुक्यातील झेंडेपार व नांदळी येथील छोट्या लोहखाणींचे कामही प्रस्तावित आहे. एकूणच लोहखाणींमुळे एकेकाळी माओवाद्यांच्या भीतीने भयग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा आता स्टील हब बनण्यास सज्ज झाला आहे.
2 बाय 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईंडिंग युनिट)
10 दशलक्ष टन प्रतिवर्ष (थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट)
2 बाय 4 दशलक्ष टन प्रतिवर्ष (आयरन ओर पेलेट प्लाँट)
4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता इंटिग्रेटेड स्टील प्लांटची
20 हजार कोटी रुपये खर्चून हा उद्योग उभारला जात आहे
5 हजार नागरिकांना रोजगार मिळणार सूरजागड-कोनसरी प्लांटद्वारे