Dhananjay Munde On Manoj Jarange Patil Pudhari
महाराष्ट्र

Dhananjay Munde: 'माझी नार्को टेस्ट करा, मला मर्डरर...' मनोज जरांगेंच्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

Dhananjay Munde On Manoj Jarange Patil Murder Conspiracy: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Rahul Shelke

Dhananjay Munde Responds to Manoj Jarange Patil’s Claims: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केला. जरांगे यांनी सांगितले की, त्यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला आहे. या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि आरोप फेटाळून लावले.

"माझं आणि जरांगेंचं कोणतंही वैर नाही"

मनोज जरांगे यांच्या आरोपांवर उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, “मनोज जरांगे यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. मंत्री असताना त्यांच्या उपोषणाच्या काळात माझ्याच हातून त्यांनी उपोषण सोडले होते. तेव्हा आमचे संबंध वैराचे नव्हते, आजही नाहीत. मी कधीच त्यांच्या विरोधात एका शब्दानेसुद्धा बोललो नाही.”

ते पुढे म्हणाले, “मी 17 तारखेला घेतलेल्या सभेत काही मुद्दे मांडले, पण त्यानंतर मी जरांगेंविषयी कधीही टीका केली नाही. आता अचानक मी त्यांच्याविरोधात कट रचला, हे कुठून आलं? मी नेहमी सर्व समाजांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. मग असा आरोप का केला जातोय, हे समजत नाही.”

मुंडे म्हणाले, “मी प्रत्येक सोमवारी गेस्ट हाऊसमध्ये बसतो. अनेक लोक भेटायला येतात, बोलतात. त्यात कुणाशी बाजूला जाऊन बोललो, तर त्याचा अर्थ कट रचला असा होत नाही.”

ते पुढे म्हणाले, “माझ्या विरोधात मला 'मर्डरर' म्हणून दाखवायचं हे काहींचं राजकीय उद्दिष्ट दिसतंय. मी फक्त एवढंच म्हणतो, मराठा आरक्षण मिळायला हवं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. एवढाच आमच्यातला मतभेद आहे.”

"CBI चौकशी आणि नार्को टेस्ट करा"

मुंडे यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली. ते म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने न करता थेट CBI ने करावी. जर माझ्या मनात खरंच कोणाला इजा करण्याचा विचार आला असेल, तर माझी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा. त्याचबरोबर मनोज जरांगे आणि पकडलेले आरोपी यांचीही टेस्ट करा. कोर्टाची परवानगी लागली, तर मी स्वतः वकिल लावून ती परवानगी घेईन. सत्य नक्की समोर येईल.”

"AI मुळे काहीही बनवता येतं, हे फार महागात पडेल"

धनंजय मुंडे म्हणाले, “आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काहीही बनवता येतं. माझ्या आवाजात कुठलंही खोटं ऑडिओ तयार करून अफवा पसरवणं सोपं झालंय. माझा फोन सतत चालू असतो, कारण गरीब लोक मला अडचणीसाठी फोन करतात. त्यामुळे मी कोणाशी बोललो म्हणजे कट रचला, असा अर्थ काढणं चुकीचं आहे.”

ते पुढे म्हणाले, “मनोज जरांगे यांनी खोटं बोलणं बंद करावं. कारण जितकं खोटं ते पसरवतील, तितकं ते त्यांच्या विरोधात फिरेल. या सगळ्या आरोपांचा परिणाम त्यांनाच भोगावा लागेल.”

मुंडे यांनी स्पष्ट केलं की, “हे सगळं राजकीय हेतूने केलं जातंय. निवडणुकीच्या तोंडावर लक्ष वेधण्यासाठी माझं नाव घेतलं जातंय. पण मी घाबरणार नाही. सत्य माझ्या बाजूने आहे, आणि सत्य लपवून ठेवता येत नाही.” या आरोप-प्रतिआरोपामुळे मराठा आरक्षणाचं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच पेटलं आहे. आता राज्य सरकार आणि तपास यंत्रणा या प्रकरणात कोणती पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT