DGCA Bribery Case Pudhari
महाराष्ट्र

DGCA Bribery Case: DGCA मध्ये मोठा घोटाळा; 37 लाखासह वरिष्ठ अधिकारी CBIच्या जाळ्यात, रोहित पवारांचा गंभीर आरोप

DGCA Bribery Case: CBIने DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक केली. छापेमारीत 37 लाख रोख, सोने-चांदी आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

DGCA Bribery Case: दिल्लीमध्ये मोठं लाचलुचपत प्रकरण उघडकीस आलं आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) नागरी उड्डाण क्षेत्राशी संबंधित नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

CBI च्या माहितीनुसार, DGCA मधील डेप्युटी डायरेक्टर जनरल यांच्यावर एका खासगी कंपनीकडून लाच मागितल्याचा आरोप आहे. संबंधित अर्ज आणि परवानग्या मंजूर करण्यासाठी त्यांनी पैसे मागितल्याचं समोर आलं.

या प्रकरणात CBI ने 18 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सापळा रचून संबंधित अधिकाऱ्यासह खासगी कंपनीच्या प्रतिनिधीलाही अटक करण्यात आली.

छापेमारीत काय सापडलं?

CBI ने दिल्लीतील चार ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान 37 लाखांची रोख रक्कम,
सोने आणि चांदीची नाणी तसेच काही डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत.

राजकीय प्रतिक्रिया

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, DGCA मध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप आम्ही पूर्वीपासून करत होतो आणि ही घटना त्याचं उदाहरण आहे. “अटक झालेला अधिकारी हा फक्त छोटा मासा आहे, यामागे अजून मोठे मासे असू शकतात,” असा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार पुढे म्हणाले, ''DGCA च्या Airworthiness विभागाच्या उपसंचालकाला CBI ने अटक केली असून FIR झाली आहे. DGCA मध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी असल्याचे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत, हे यामुळे सिद्ध झाले आहे.

अटक झालेला तर छोटा मासा आहे, याहून मोठमोठे मासे या यंत्रणेत आहेत. लाच देऊन DGCA मध्ये कामे होत असतील तर लाच देण्यात, दलाली करण्यात पटाईत असलेला व्ही. के. सिंग याने कशाप्रकारे दादांच्या अपघातसंदर्भातील कागदपत्रे क्लीन केले असतील याचा अंदाज येतो.

एकीकडे दादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची विनंती करून दोन महिने उलटले तरी सीबीआयने तपास हातात घेतला नाही, परंतु दुसरीकडे सीबीआय स्वतःहून ऍक्शन घेते हे विशेष म्हणावे लागेल. कदाचित TDP च्या मंत्रालयाला इशारा किंवा अप्रत्यक्ष मेसेज दिला असावा म्हणूनच प्रादेशिक अस्मिता बाजूला सारून TDP कडून डिलीमिटेशन संदर्भात केंद्र सरकारच्या आदेशांचे तंतोतंत पालन केले जात असावे!''

या प्रकरणामुळे नागरी उड्डाण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर परवानग्या आणि मंजुरीसाठी लाच द्यावी लागत असेल, तर संपूर्ण यंत्रणेवरच संशय निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT