नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पार पडली.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून आमदारांची मते जाणून घेतली जातील आणि त्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास शिवसेना शिंदे गटाकडे आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री पद असेल. अजित पवार गटाकडून अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री कोण असतील, याची उत्सुकता कायम आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे आणि शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणारे पहिले पद घ्यावे, अशी विनंती शिंदे गटाच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंना केल्याचे समजते.
गुरुवारी दुपारी अजित पवार सर्वप्रथम दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी प्रफुल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांसोबत एक बैठक पार पडली. राज्य सरकारमध्ये आपली भूमिका काय असावी, या संदर्भात ही बैठक होती. त्यानंतर संध्याकाळी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्यानंतर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला फडणवीस यांच्यासह अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल उपस्थित होते. या दोन बैठकानंतर अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते.
अमित शाह यांच्या निवासस्थानी इतर नेते पोहोचण्यापूर्वी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा दाखल झाले होते. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू असताना एकनाथ शिंदे थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
तिन्ही पक्षांची बैठक सुरू होण्यापूर्वी अमित शाह, जे. पी. नड्डा आणि एकनाथ शिंदे या तिघांची स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या अपेक्षा अमित शाह आणि नड्डा यांच्यासमोर मांडल्याचे समजते.
राष्ट्रवादीने मागील मंत्रिमंडळात असलेल्या खात्यांसह ग्रामीण भागाशी संबंधित खात्यांवर इच्छा व्यक्त केली. तर शिवसेना शिंदे गटाने शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागाशी संबंधित खाते आपल्याला मिळावेत अशी इच्छा व्यक्त केल्याचे समजते.