IAS Pooja Khedkar File Photo
महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar| आयएएस पूजा खेडकरांच्या नियुक्तीवर वाद; वैद्यकीय सवलतींचे गैरवापर?

कमी मार्क्स असतानाही विशेष सवलतीमुळे मिळाला दर्जा

पुढारी वृत्तसेवा

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय सुविधांचा अनाठायी हट्ट केल्याने वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी महिला अधिकारी आयएएस पूजा खेडकर यांचे आयएएस बनणेच आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा (व्हिज्युअली इम्पेअर्ड) दृष्टिदोष असल्याचे सर्टिफिकेट देत दिली आहे.

याचबरोबर त्यांनी मेंटल इलनेस आहे, असे सर्टिफिकेट सादर केले, त्याआधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस बनल्या आहेत. जर ही सवलत त्यांना मिळाली नसती, तर त्यांना जितके मार्क्स मिळाले होते ते पाहता त्या आयएएसचा दर्जा प्राप्त करू शकल्या नसत्या.

जेव्हा त्यांना आयएएसचा दर्जा मिळाला तेव्हा यूपीएससीने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचे ठरविले. मात्र, तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले होते. सर्वांत आधी २२ एप्रिल २०२२ ला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करायचे ठरले. मात्र, आपल्याला कोविड झाल्याचे कारण देत पूजा खेडकर यांनी जाण्याचे टाळले होते.

त्यानंतर २६ मे २०२२ ला पुन्हा एम्स रुग्णालयात, तर २७ मे २०२२ ला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी बोलावण्यात आले. मात्र, पूजा खेडकर अनेकदा बोलावून देखील गेल्या नाहीत. त्यानंतर १ जुलैला त्यांना पुन्हा एम्समध्ये बोलावण्यात आले. पण, त्या गेल्या नाहीत. २६ ऑगस्ट २०२२ ला पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाल्या. तिथे त्यांना २ सप्टेंबरला एमआरआय चाचणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.

पूजा खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झालीय, याची तपासणी न्यूरो ओपथोमोलॉजिस्ट यांच्या उपस्थितीत या दिवशी होणार होती. मात्र, एम्स रुग्णालयातील ड्युटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करूनही पूजा खेडकर एमआरआयला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२२ ला पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला. मात्र, त्यानंतर त्यांनी एका एमआरआय सेंटरमधून अहवाल आणून तो यूपीएससीला सादर केला. मात्र, यूपीएससीने त्याला हरकत घेतली.

असे काय घडले आणि नियुक्ती वैध ...

सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिले. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२३ ला पूजा खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला. मात्र, त्यानंतर असे काय घडले की पूजा खेडकर यांनी सादर केलेले ते एमआरआय सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आले आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवून त्यांना आयएएस दर्जा देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT