छत्रपती शिवाजी महाराज  file photo
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज पर्यटन सर्किट बनवण्याचे केंद्र सरकारने दिले आश्वासन

Chhatrapati Shivaji Maharaj |लाेकसभेत श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे उत्तर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज पर्यटन सर्किट बनवण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करेल, असे आश्वासन केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी लोकसभेत दिले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व पैलू एकत्रितपणे प्रदर्शित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पर्यटन सर्किट बनवण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर पर्यटनमंत्र्यांनी सांगितले की, पुण्यातील शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क विकसित करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित सर्व पैलू प्रदर्शित करण्यासाठी राज्य सरकारने अलिकडेच एक सविस्तर योजना प्रस्तावित केली आहे. त्यांनी सांगितले की, तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. यामध्ये केंद्र सरकारने ७६ कोटी रुपयांची मदतही दिली. याअंतर्गत, लोहगड किल्ल्याचे नूतनीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल. यावर काम केले जात आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील संग्रहालयासाठी ४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. नौदलाच्या ध्वजाला छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज असेही नाव दिले, असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, सरकारने महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील किल्ल्यांची एकत्रित यादी जागतिक वारसा समितीला सादर केली आहे. भविष्यात यामुळे देशातील पर्यटनाला आणखी चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच, त्यांनी असेही आश्वासन दिले की या संदर्भात राज्य सरकारकडून जे काही प्रस्ताव येतील, त्यांचा संसाधनांची उपलब्धता लक्षात घेऊन विचार केला जाईल.

या प्रश्नाशी संबंधित पूरक प्रश्नांवर, खासदार डॉ. शिंदे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडून छत्रपती संभाजी नगरमधील हेरिटेज कॉरिडॉरचे संवर्धन आणि सुशोभीकरण, कोयना नगर पार्क डेव्हलपमेंट आणि कोयना बॅकवॉटर डेव्हलपमेंटसाठी १३२ कोटी रुपयांच्या मास्टर प्लॅनच्या प्रस्तावांची स्थिती काय आहे याची माहिती मागितली. ज्याला उत्तर देताना शेखावत म्हणाले की, पर्यटनाबाबत मिळालेल्या प्रस्तावांना लवकरच मान्यता दिली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT