राधानगरी : राधानगरी मतदारसंघ विकासाच्या ट्रॅकवर आलेला आहे. पुढील पाच वर्षांत राज्यात उत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन आ. प्रकाश आबिटकर यांनी केले. ते राधानगरी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. राधानगरी शहरात अक्षरश: गर्दीचा महापूर आला होता. लहानापासून आबालवृद्धांपर्यंत लोक बेभान होऊन आमदार आबिटकर यांचा एकच जयघोष करत होते. आ. आबिटकर म्हणाले, मी फक्त विकासाचे राजकारण केले. मतदारसंघातील 70 टक्के धनगर वाड्यावर लाईट पोहोचवली. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यांसारख्या विकासकामाबरोबरच 80 हजार लाडकी बहीण, 10 हजार लोकांना वयोश्री योजनेचा लाभ मिळवून दिला. माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, राधानगरीत गर्दीचा महापूर उसळला असून आजचा अथांग जनसागर हा आ. आबिटकर यांच्या विजयाची नांदी आहे. आरपीआयचे राज्य सचिव प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, मतदारसंघातील सर्व आंबेडकरी जनता आबिटकर यांच्या पाठीशी ठामपणे राहील.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, आज उसळलेली गर्दी ही आमदार आबिटकर यांची विजयाची सभा असल्याचा भास होत आहे. विरोधकांना मते मागण्याचा अधिकारच नाही. यावेळी ज्येष्ठ नेते के. जी. नांदेकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, कल्याण निकम, नंदकुमार सूर्यवंशी, अशोक फराकटे, अशोक पाटील, रविश पाटील, संभाजी आरडे, अभिषेक डोंगळे, बाळासाहेब नवणे, तानाजी चौगले, विजय महाडिक, नामदेव चौगुले, संदीप वरंडेकर, धैर्यशील भोसले, विद्याधर परीट, सुभाष जाधव, व्ही. टी. जाधव, विलास रणदिवे, संग्राम पाटील, दीपक शेट्टी आदी उपस्थित होते.
आमदार आबिटकर यांचा राधानगरी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे 15 किलोमीटर मोटारसायकल आणि चार चाकी वाहनांची रांग लागली होती. 40 हजारांच्या या जनसागरात लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती. 2014, 2019 च्या गर्दीचे सर्व उच्चांक यावेळच्या गर्दीने मोडून काढले.
राधानगरी : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आ. प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करत उमेवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी संपत्तीचे विवरणपत्र सादर केले आहे. स्थावर मालमत्ता 33 लाख 24 हजार 277 रुपये तर जंगम मालमत्ता 89 लाख 27 हजार 657 रुपये आहे. कर्ज 18 लाख 56 हजार 994 रुपये आहे. तसेच एक दुचाकी व दोन चार चाकी वाहने असल्याचे विवरणपत्रात म्हटले आहे.