सातारा : इंदापूरच्या सभेत शरद पवार यांचे भाषण सुरू होते. हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश सुरू असताना शरद पवार यांनी आपल्या भाषणात 'आता पुढची तारीख आहे १४ ऑक्टोबर ! इथले झाले की बोलावणे आले आहे फलटणचे, फलटणमध्ये कोण प्रवेश करणार आहे तुम्हाला माहीतच आहे', असा गौप्यस्फोट करताच संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तवाहिन्यांवर हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावेळीच रामराजे ना. निंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशाच्या बातम्या झळकू लागल्या. पुढचे तीन-चार दिवस महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्येही रामराजे ना. निंबाळकर हे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. शरद पवारांनी ठरवल्याप्रमाणे १४ ऑक्टोबरला फलटणला ती पक्ष प्रवेशाची जाहीर सभा झालीच, पण राजकारणात तरबेज असलेल्या रामराजेंनी 'सन' सैन्यासह बंधू व सराजम्यांसह सगळे शरद पवारांच्या तंबूत धाडले आणि स्वतः मात्र अलिप्त राहिले. त्यामुळेच महाराष्ट्राला रामराजेंच्या या खेळीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. या खेळीत जिंकले कोण? शरद पवार? अजित पवार? की रामराजे ना. निंबाळकर ?
महाराष्ट्राच्या इतिहासात फलटण संस्थानचे मोठे महत्त्व आहे. स्वराज्याचे दूसरे छत्रपती संभाजी महाराजांचे हे आजोळ घराणे. संभाजीराजेंच्या आई सईबाई या निंबाळकर घराण्यातल्या. याच घराण्यातल्या मालोजीराजे ना. निंबाळकर यांचे कोयना धरणाच्या निर्मितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मोठे योगदान आहे. हाच वारसा फलटण संस्थानचे विद्यमान अधिपती असलेल्या रामराजे ना. निंबाळकर यांनी चालवला. फलटणच्या नगराध्यक्ष पदापासून राजकारणाची सुरुवात केलेल्या रामराजेंनी १९९५, १९९९, २००४ अशा सलग तिन्ही विधानसभांमध्ये विजय मिळवला.
२००९ पासून फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. या मतदार संघातून त्यांनी सलग तीन टर्म म्हणजे २००९, २०१४, २०१९ ला आपले समर्थक दीपक चव्हाण यांना निवडून आणले. १९९५ पासून ते २०१९ पर्यंत रामराजे ना. निंबाळकर यांचे फलटण विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राहिले. युती सरकारच्या काळात रामराजे कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले. १९९५ पासूनच रामराजेंच्या राजकारणाला शरद पवारांचे आशीर्वाद राहिले. शरद पवारांच्या ताकदीवर रामराजेंनी प्रसंगी अजित पवारांना शह देत सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा कासरा खुबीने आपल्या हातात घेतला, शरद पवारांनीही त्यांना भरभरून दिले. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये रामराजे मंत्री राहिले. त्यांना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षही केले. एवढेच काय महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती केले. शरद पवार यांनी राजकारणातील अत्युच्च पदे रामराजेंना दिली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर रामराजेंनी शरद पवारांना सोडले, ती त्यांची राजकीय चूक होती.
२०१९ पर्यंत रामराजेंचे राजकारण एकतर्फी व निर्णायक होते. मात्र, रणजितसिंह ना. निंबाळकर यांची राजकारणात एंट्री झाल्यानंतर आणि त्यांना आ. जयकुमार गोरे यांनी साथ दिल्यानंतर फलटणचे राजकारण बदलू लागले. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत रामराजेंचे विरोधक रणजितसिंह ना. निंबाळकर खासदार झाले आणि राजकारण कमालीचे संघर्षमय झाले. खा. रणजितसिंह निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांच्या गटाची प्रत्येक ठिकाणी रामराजेंविरोधात ठिणगी पडू लागली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीममध्ये रणजितसिंह ना. निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांचा जसजसा वावर वाढू लागला तसतसा रामराजेंच्या गटाला आपल्यावरच्या आक्रमणाची चाहूल लागली. त्यातूनच सत्तेत राहून आपला गट शाबूत ठेवण्यासाठी, कार्यकत्यांना प्रवाहात ठेवण्यासाठी व विकासकामे न थांबण्यासाठी रामराजेंना अजित पवारांसोबत जावे लागले. त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये सभापती पदाचाही शब्द होता म्हणे! मात्र, अजितदादांच्या सोबत जाऊनही रामराजेंना हे सभापतिपद मिळाले नाही.
लोकसभेला महायुतीत असूनही रणजितसिंहांच्या उमेदवारीला विरोध करत रामराजेंनी बंडाचा झेंडा फडकवला. त्यामुळे पराभव होऊनही रणजितसिंहांनी रामराजेंविरोधात आक्रमक मोहीम उघडली. एकीकडे सभापतिपदावर न लागलेली वर्णी दुसरीकडे रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा सुरू झालेला टोकाचा विरोध त्यातून रामराजे समर्थकांनी लोकसभेप्रमाणेच आताही तुतारीचा पुकारा सुरू केला. रणजितसिंह निंबाळकर व जयकुमार गोरे यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून अजितदादांनी लक्ष न दिल्यास कंटाळून प्रसंगी तुतारी हातात घ्यावी लागेल, अशी भाषा रामराजेंनीही केली. त्यामुळेच अजितदादांनी सोळशीच्या सभेत खेळी करून रामराजेंचे उमेदवार असलेले दीपक चव्हाण यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसमधून रामराजेंना न विचारता जाहीर करून टाकले. अजितदादांच्या या खेळीने रामराजे 'चेकमेट' होतील, असा सर्वांचा समज झाला. मात्र, रामराजेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
वातावरणातली लहर ओळखून शरद पवारांनीही एकाचवेळी रामराजे व अजित पवार यांना 'चेकमेट' करत इंदापूरच्या सभेत 'आता पुढचा प्रवेश फलटणला १४ तारखेला आहे', असे सांगत रामराजेंचे माघारीचे दोर कापून टाकले. १४ ऑक्टोबरला फलटणमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत संपूर्ण राजेगटाने तुतारी हाती घेत 'रामजी की निकली सवारी, रामजी की लिला है न्यारी' असाच संदेश दिला, शरद पवार यांच्या या व्यासपीठावर जायचे टाळत रामराजेंनी पवारांचा चेंडू पद्धतशीरपणे गोल करून घेतला. रामराजेंच्या या 'अदृश्य' पक्षांतराने सातारा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांवर थोडा बहुत का होईना 'सदृश्य' परिणाम दिसेल. एकीकडे अजित पवारांनी उमेदवारी जाहीर करून केलेली कोंडी त्यावर शरद पवारांनी कडी करत केलेली व्यूहरचना आणि या सर्वांवर मात करत स्वतःचा गट पद्धतशीरपणे शरद पवारांसोबत ठेवत रामराजेंनी दाखवलेली अलिप्तता यातून मोठा माईंड गेम समोर आला. या खेळीत जिंकले कोण... शरद पवार? अजित पवार? की रामराजे ना. निंबाळकर? हे एक महिन्यानंतरच समजणार आहे. मात्र, यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या बलाढ्य नेत्यांनी खेचाखेचीच्या राजकारणात एकमेकांवर केलेल्या चाली, प्रतिचाली समोर आल्या. मैदानावरील खेळापेक्षा 'माईंड गेम' किती मोठा असतो याची यातून प्रचिती आली.