Maharashtra assembly election
राजापूर : राजापुरात मतदानासाठी मतदारांची लागलेली रांग. pudhari photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

वाढलेला मतदान टक्का कुणाला लाभदायक?

Maharashtra assembly poll | राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राजापूर विधासभा मतदारसंघात सुमारे 55 टक्के मतदान झाले होते. मात्र, या निवडणुकीत हा मतदानाचा टक्का वाढला असून, यावेळी सुमारे 63 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा हा वाढलेला टक्का नक्की कुणाला फायद्याचा ठरणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असून 23 नोव्हेंबरला या वाढलेल्या मतदानाचे फलित उघड होणार आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघात उध्दव सेना व शिंदे सेना यांच्यातच लढत पाहायला मिळाली. त्यातच काँग्रेस पक्षातून झालेली बंडखोरी या विधानसभेच्या निकालावर परिणाम करणारी ठरणार असल्याचे भाकित वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यानी महाविकास आघाडीत बंडखोरी करत अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अविनाश लाड व शिवसेनेचे राजन साळवी यांच्या थेट लढत झाली होती. त्यावेळी लांजा व साखरपा या भागातील मतमोजणीत अविनाश लाड यांनी राजन साळवी याना कडवी लढत देत आघाडी मिळवली होती. मात्र, राजापूर तालुक्यातील मतपेट्या या राजन साळवी याना विजयी करणार्‍या ठरल्या होत्या.(Maharashtra assembly poll)

संपूर्ण निकाल हाती आला तेव्हा आ. साळवी सुमारे 11 हजार मतांची आघाडी घेत निवडून आले होते. मात्र, यावेळी महाविकास आघाडी असतानाही अविनाश लाड यांनी आघाडी धर्माला धोबीपछाड देत बंडखोरी केली. परिणामी, शिंदे सेनेच्या किरण सामंत यांच्याबरोबरच राजन साळवी यांना आघाडीतच अविनाश लाड यांचा सामना करावा लागला.

दरम्यान, यावेळी निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का हा शिंदे सेनेच्या किरण सामंत यांनी स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी मतदारसंघात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित मानले जात आहे.(Maharashtra assembly poll)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.