पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नसला, तरी राष्ट्रवादी पक्षातील कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? आणि त्यांना कोणती खाती मिळणार? याची एक यादी समोर आली आहे. सोबतच राष्ट्रवादी त्यांच्या जुन्या खात्यांसाठी आग्रही असल्याचे समजते.
त्यानुसार अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खाते, छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा, अनिल पाटील यांच्याकडे आपत्कालीन, आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते आणि संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा खाते कायम राहण्याची शक्यता आहे. नरहरी झिरवळ, धर्मरावबाबा आत्राम यांचीही नावे संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत आहेत.
महायुतीची मुंबईतील बैठक रद्द झाल्यामुळे ज्या विषयांवर तोडगा निघू शकला नाही, त्यावर नव्याने चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह दिल्लीत पुन्हा एकदा बैठक घ्यावी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.