वाशिम: पुढारी वृत्तसेवा : वणी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हेलिकॅप्टरसह तपासणी केल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तर यावर स्वत: ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग तपासण्याची तुमची हिंमत आहे का ? असा सवाल करून आता तुम्ही माझे युरीन पॉट सुद्धा तपासणार का? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते वाशिम येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
ते (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये झालेला अंधार दूर करण्यासाठी मशाल घेऊन आलो आहे. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या बहिणीने राखी बांधल्यावर लाडकी झाली, असा निशाणा त्यांनी माजी खासदार भावना गवळी यांच्यावर नाव न घेता साधला. मोदी, शहा, मिंदे यांची बॅग तपासण्याची तुमची हिंमत आहे का ? असा सवाल करून मोदी आणि शहा यांच्या ही गाड्या जाताना तपासल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलीप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महायुती सरकारने नागरिकांना दिलेल्या आनंदाच्या शिद्यात उंदराच्या लेंडया निघाल्या ही तर गरिबांची थट्टा आहे, अशी टीका केली. (Maharashtra Assembly Polls)
कोल्हापूरमध्ये जाहीर सभेत लाडकी बहिण योजनेवरून वादग्रस्त विधान केलेल्या भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. मुन्ना महाडिक काय बापाचा पैसा देतो काय?, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त करून महाराष्ट्र हा स्वावलंबी झाला पाहिजे, असे सांगितले.