मनोज जरांगे-पाटील File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

हा लढा थांबता कामा नयेः मनोज जरांगे पाटील

Maharstra Assembly Poll| अंतरवली सराटी येथे घेतल्‍या इच्छुकांच्या मुलाखती

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री :    मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या . याच दरम्यान जालना जिल्ह्यातील इच्छुकांशी बोलताना मनोज जरांगे हे भावनिक झाल्याचे दिसले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. या जगात कोणी कोणाचं नाही बाबांनो, हा लढा थांबता कामा नये असे सांगताना मनोज जरांगे यांचा कंठ अक्षरश: दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले, हे पाहून सर्वच भावूक झाले.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?

  हा लढा थांबता कामा नये, अशी साद मनोज जरांगे यांनी घातली. समाज भयाण संकटातून जात आहे. संकट तोडायचं कसं ? मी संकट तोडतोय , मला राजकारण्यांचं बळ नाही. मी गोर- गरीबांना घेऊन किती दिवस लढू ? त्यांच्या मनगटात ताकदही नाही. ज्याच्या मनगटात दगड उचलायची हिंमत राहिली नाही.त्याचे दोन हात- दोन पाय असूनही मोडून टाकल्यासारखे झाले आहेत. त्याला उभारी नाही द्यायची ? त्याच्या हातात काठी नाही द्यायची ? ते सोडून या वेळेला आपण त्याच्या अंगावर रॉकेल ओतायला लागलो आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मला तुमचे बळ आणि आर्शीवाद हवेत

एवढ्या मोठ्या, बलाढ्य समाजाचं दु:ख जाणायचं नाही तर कसं होईल? एवढा मोठा समाज संपला ना बाबांनो तर आपल्याला कोणी नाही. या दुनियेत कोणी कोणाचं नाही. आपला समाज देवापेक्षा मोठा आहे, या समाजाने इतिहास घडवून दाखवला. मला तुमची सत्ता नको, मला तुमचे पैसे नको, बळ आणि आशीर्वाद पाहिजे. समाजाची परिस्थिती लय बिकट आहे मराठा समाजाला संपवायला लागले आहेत असे भावनिक उद्गार मनोज जरांगे यांनी काढले.

शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी घेतली भेट

उमरगा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले मनोज जरांगेच्या भेटीसाठी आले होते. ज्ञानराज चौगुले हे लातूर जिल्ह्यातील उमरगा या राखीव मतदार संघाचे उमेदवार आहेत. शिंदे गटाकडून उमेदवार अर्ज भरून घेतल्यानंतर चौगुले यांनी मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT