डोंबिवली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने क्लृप्ती लढवली आहे. कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी विविध स्वीप कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. सोमवारी (दि.28) मतदार जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वासूदेवांच्या भजनाचा मतदारांवर सर्वाधिक प्रभाव पडल्याचे दिसून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी स्वीप पथकाचे अर्थात मतदार जनजागृती पथकाचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, ड प्रभाग कार्यालय, शनि मंदीर, काटेमानेवाली, जाईबाई विद्यालय, पावशे पाडा, काटेमानेवाली गांव, हनुमान नगर, निर्मला स्मृती, वालधुनी रेल्वे ब्रीज, कल्पविला, नेने वाडी, मयूर सदन, समता कॉलनी, मिलींद नगर, वालधुनी, आदी परिसरासह आनंदवाडी, ज्योती किराणा स्टोअर्स परिसरात वासूदेवांमार्फत मतदान जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. त्याचप्रमाणे लाऊडस्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजविण्यात आले. जनजागृतीचे स्टिकर्स आणि पत्रकांचे वाटप करून नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. या प्रसंगी निवडणूक स्टुडंट आयकॉन प्रणव देसाई, स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, रविंद्र तवर, जितेश म्हात्रे, आदिती पवार, भारती डगळे, तुळशिराम झोपे, शिरिष म्हात्रे, आदी कर्मचारी उपस्थित होते.