महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कुठला विधानसभा मतदार संघ कुठल्या पक्षाला सोडावे, यावर खलबते सुरू असून इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काहींनी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे काही नेत्यांनी इच्छुकांना पक्षात येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यात ठाणे कसे मागे राहील. शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आनंद दिघेंच्या नावाची जादू असलेल्या ठाण्यात हे पक्षांतर झाल्यास ठाकरे गटाला मोठा झटका बसेल. (If this defection occurs in Thane, where the name of Anand Dighe is magic, the Thackeray group will suffer a big blow)
ठाणे महापालिका हद्दीतील चार विधानसभा मतदार संघातील दोन आमदार शिवसेना शिंदे गटाचे असून एक आमदार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आहे. मुंब्र्यात डॉ. जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा विधानसभा लढणार असून त्यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल, याची चाचपणी सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांना आव्हाड यांच्याविरोधात उतरविण्याची रणनीती आखली जात असताना शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना पुन्हा घरी बसावे लागणार आहे. स्थानिक विकास आघाडीच्या नावाखाली माजी नगरसेवक राजन किणे यांनी आव्हाड यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांना यावेळी विधानसभेत डावलण्यात आले तर आगामी महापालिका निवडणुकीत समीकरणे बदलू शकतात, अशी भीती स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे आ. संजय केळकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी तर ओवळा माजिवडा मतदारसंघातून आ. प्रताप सरनाईक हे लढतील. मात्र त्यांच्याविरोधात कुठला सक्षम उमेदवार द्यावा, यावर महाविकासआघाडीत एकमत होत नाही. अशी राजकीय परिस्थिती असताना ठाकरे गटाच्या दोन सक्षम नेत्यांना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते वरिष्ठ पदावर असून त्यापैकी एकाला शिंदे गटाकडून उमेदवारी मिळू शकते, अशीही चर्चा रंगू लागली आहे. त्याचवेळी शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या नावालाही विरोध होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत वाद विकोपाला गेले तर काही नेत्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. त्यापैकी एक शिवसेना ठाकरे गटात जाऊन विधान सभा लढवू शकतात, अशी स्फोटक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला फोडून दिघेंच्या नावाचा प्रभाव अधिक वाढवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यभर प्रचार करण्यासाठी मोकळे करावे, अशा चाणक्य नीतीचा वापर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.