वसई : नरेंद्र राठोड
सुरेश दुबे यांच्याकडे एक मोक्याचा भूखंड होता, हा भूखंड भाई ठाकूरांनी मागितला होता. यावरून दुबे-ठाकूर वाद झाला. यानंतर दुबे घराबाहेर पडत नसत. मात्र, एका नातेवाईकाबरोबर दुबे पार्ल्याला जाण्यासाठी निघाले होते. नालासोपार्यात ट्रेनची वाट पाहात असताना मारेकरी आले, धडाधड गोळ्या घातल्या गेल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनीही कुणाचं नाव घेतलं नाही. हत्येचा साक्षीदार कुणीही पुढे आला नव्हता. यानंतर डीआयजी सुधाकर सुर्हाडकर यांनी गुन्हा दाखल करून घेतला. भाई ठाकूर यांना टाडा लागला आणि शिक्षाही झाली. हे प्रकरण श्रमजीवीचे विवेक पंडित यांनी लावून धरलं होतं. आज भाई ठाकूरांचे बंधू हितेंद्र ठाकूर राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना कुणीच हरवू शकणार नाही, असा इथला इतिहास. मात्र, सहा वेळा निवडून येणारे हितेंद्र ठाकूर यांना दुबे यांच्या स्नुषा स्नेहा पंडित-दुबे यांनी हरवलं आणि जुना इतिहास जागा झाला.
वसई-विरारच्या राजकारणात भाजपचे मित्र असलेलेच हितेंद्र ठाकूर यांचा भाजपच्याच उमेदवार स्नेहा पंडित-दुबे यांनी पराभव केला आणि जुन्या इतिहासावर पुन्हा प्रकाश पडला असून 35 वर्षांचे वर्तुळ अखेर पूर्ण झाले आहे.
वसई विधानसभेत 2009 सालची एक टर्म अपवाद सोडता सलग 35 वर्षांची सत्ता उपभोगणार्या आणि पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला पराभव पत्करावा लागला.
बविआचे अध्यक्ष आणि वसईतून सतत सहा वेळा विजयी झालेले विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांचा भाजपा महायुतीच्या सौ. स्नेहा पंडित-दुबे यांनी 3,153 मतांनी पराभव करत त्या जायंट किलर ठरल्या.
अगदी काही दिवसांपूर्वीच उमेदवारी मिळाल्यामुळे राजकारणात आलेल्या सौ. स्नेहा दुबे-पंडित यांच्याकडून झालेला आ. हितेंद्र ठाकूर यांचा पराभव त्यांच्या पक्षासाठी अत्यंत आश्चर्यजनक मानला जात आहे.
स्नेहा दुबे-पंडित या माजी आमदार विवेक पंडित यांच्या कन्या असून, श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि एकूणच या संघटनेची शक्तीसुद्धा त्यांच्या मदतीला आली आहे. आई विद्युलता आणि विवेक पंडित यांची पुण्याई, तसेच ‘लाडकी बहीण’सह महायुती सरकारच्या लोकोपयोगी जिव्हाळ्याच्या विकासयोजनांचा लाभ त्यांना झालेला असून, वसईत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि माजी राज्यपाल राम नाईक यांच्यासह भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी केलेला प्रचार, भाजपची येथील संघटनात्मक ताकद यामुळे त्यांचा विजय सुकर झाला आहे.
बविआचे विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर, काँग्रेसचे विजय पाटील आणि भाजपच्या स्नेहा दुबे-पंडित या प्रमुख उमेदवारांसह चार अपक्ष मिळून एकूण सात उमेदवार वसईतून निवडणूक लढवत होते. या चार अपक्षांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत.
महायुतीच्या लाटेत पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघातून अनुक्रमे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील या तिघांच्या पराभवापैकी अगदी निसटता झालेला हितेंद्र ठाकूर यांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खूपच धक्कादायक ठरला. नालासोपारा आणि बोईसरच्या निकालांबद्दल काहीशी साशंकता आधीपासूनच चर्चेत होती. नालासोपारा मतदारसंघात भाजपच्या राजन नाईक यांनी 37 हजारांचे मताधिक्य घेत 15 वर्षे आमदार असलेल्या क्षितिज ठाकूर यांना घरी बसवले. मात्र, हितेंद्र ठाकूर यांना अगदी नवख्या असलेल्या भाजपच्या सौ. स्नेहा दुबे-पंडित यांच्याकडून मात खावी लागली.
सन 2014 सालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही आपापल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील वर्चस्व कायम ठेवणार्या बहुजन विकास आघाडीसाठी हा पराभव चिंतेचा विषय ठरला आहे.
एकूण मतदान : 2,19,220
स्नेहा दुबे : 77,553
हितेंद्र ठाकूर : 74,004
मताधिक्य : 3153
नोटा : 2350