ठाणे : मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्यासाठी अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी सोमवार (दि.28) जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचा पाडाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस अजित पवार गटाने नजीब मुल्ला या त्यांच्या शिष्याला निवडणूक रिंगणात उतरविले आहे. गेल्या काही वर्षातील दोघांमधील वाद सर्वज्ञात असल्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघात आव्हाड विरुद्ध मुल्ला अशी लढत निर्माण करण्यात आलेली आहे. त्यांना शिवसेना शिंदे गट आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. त्या अनुषंगाने नजीब मुल्ला यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत रॅलीत महायुतीचे कोणी मोठे नेते दिसले नसले तरी स्थानिक शिवसेनेचे गणेश साळवी व अन्य काही नेते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नगरसेवक म्हणून ठाणे महापालिकेत प्रभाव पाडणारे मुल्ला हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी त्यांनी कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवली होती.