ठाणे : ठाणे विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री कपिल पाटील, शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवार (दि.28) रोजी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीच्या विजयाचा घोषणा देत सर्व पक्षीय स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी घंटाळी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी शक्तिप्रदर्शन रॅलीला सुरुवात केली. ढोलताशाच्या गजरात रथावर उभे राहून आमदार संजय केळकर यांनी सर्व नेत्यांसमवेत ठाणेकरांना मानवंदना दिली.
पंधरा वर्ष आमदार राहिलेल्या भाजपचे संजय केळकर यांना ठाणे विधानसभा मतदार संघातून विजयी हॅट्रिक साधण्यासाठी भाजप श्रेष्टींनीं विश्वास दाखवत पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांची लढत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांशी आहे. आपल्या शिलेदाराला ताकद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन केले. सर्वप्रथम घंटाळी मंदिरात जाऊन फडणवीस यांनी उमेदवार केळकर समवेत देवीचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील, शहर अध्यक्ष संजय वाघुले, आमदार निरंजन डावखरे , माधवी नाईक यांच्यासह महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते. शक्तिप्रदर्शन करीत संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.