भिवंडी : भिवंडीतील पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून या मतदार संघामध्ये लोकसभेच्या तुलनेत 40 हजार मतांची वाढ आजपर्यंत झाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2014 मधील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात मतदानात 5 टक्यांनी वाढ झाली असून मतदान वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अभिजित खोले, सुदाम इंगळे, बाळाराम जाधव उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया कालावधीमध्ये आचार संहिता काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी निवडणूक यंत्रणेकडून विशेष मोहीम राबविले जात आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय आस्थापनांसोबतच खासगी ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर पोस्टर काढण्याबाबतच्या सूचना महानगरपालिका व पंचायत समिती प्रशासनास देण्यात आल्या आहेत, ते वेळत काढून घेतले जातील.
ईव्हीएम मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठीची स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र कामतघर येथील वर्हाळा देवी माता मंगल कार्यालय या ठिकाणी असणार आहे. लोकसभा निवडणूक काळात या मतदार संघात 2 लाख 92 हजार 107 मतदार होते. यामध्ये 17 ऑक्टोबरपर्यंत 40 हजार 749 मतदारांची वाढ झाली आहे. आजपर्यंत 3 लाख 32 हजार 856 मतदार आहेत. ज्यामध्ये 1 लाख 89 हजार 643 पुरुष, 1 लाख 43 हजार 55 स्त्री, 157 इतर, 16 सैनिक मतदारांचा समावेश आहे.
यामध्ये दिव्यांग 1209 व 85 वर्षांवरील वयोवृद्ध 2256 मतदारांचा समावेश आहे. या विधानसभा मतदार संघात 79 ठिकाणी 303 मतदान केंद्र असून लोकसभा निवडणूक काळात 58 मतदान केंद्र मंडपात होती, ती संख्या कमी करण्यात यश आले असून यावेळी मंडपात फक्त 21 मतदान केंद्र असणार आहेत.
मतदान केंद्रावर येणार्या मतदारांसाठी विशेष लक्ष देऊ न पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर मतदान अधिक प्रमाणात व्हावे यासाठी विविध पातळीवर जनजागृती कार्यक्रम स्वीप यंत्रणेकडून विशेष मोहीम राबविली जाणार असून कारीवली, नदीनाका व नारपोली या तीन ठिकाणी चेकपोस्ट असणार आहेत, अशी माहिती शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी दिली आहे.