अपक्ष आ. गिता जैन Pudhari News Network
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

ठाणे : गीता जैन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार

मेहतांच्या उमेदवारीवर जैनसमर्थक माजी नगरसेवकांचा पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : भाजपने मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातून माजी आ. नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देताच संपतापलेल्या अपक्ष आ. गिता जैन यांनी यंदाची निवडणूक पुन्हा अपक्ष म्हणूनच लढविणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. तर जैन समर्थक माजी नगरसेवकांनी मेहतांना दिलेल्या उमेदवारीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

गतवेळच्या निवडणुकीत देखील पक्षाने जैन यांच्या तिकीट मिळविण्याच्या मनसुब्याला सुरुंग लावित मेहता यांनाच उमेदवारी दिली होती. त्यावेळी जैन यांनी मेहता विरोधकांची मोट बांधून सुमारे 15 हजार मतांनी मेहता यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांना मेहता विरोधी सेनेतील नगरसेवकांनी देखील मदत केली होती. यामुळे यांचा पराभव झाल्याचे दिसून आले होते. या दोघांच्या वादात काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसैन यांना सुमारे 56 हजार मते मिळाली होती. यंदाही भाजपने जैन यांच्या तिकीट मिळविण्याच्या मनसुब्याला सुरुंग लावत मेहतांनाच उमेदवारी दिल्याने जैन यांनी पक्षाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तसेच मेहता गंभीर गुन्हे दाखल असून भ्रष्ट असलेल्या मेहतांना उमेदवारी देण्यापूर्वी पक्षाने विचार करणे महत्वाचे होते, असे सल्लाही दिला. मेहता यांना गतवेळप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीतही पराभूत करण्यासाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जैन यांनी जाहीर केले.

जैन समर्थक माजी नगरसेवक अश्विन कासोदरिया, डॉ. नयना वसानी, प्रतिभा पाटील यांनी समाज माध्यमाद्वारे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे पक्षाचा राजीनामा पाठविला आहे. याखेरीज येत्या काही दिवसांत जैन समर्थक आणखी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देतील, असा दावा करण्यात आला आहे. जैन व मेहता यांच्यासह उमेदवारीवर दावेदारी करणारे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवि व्यास यांच्या समर्थकांमध्ये देखील मेहता यांच्या उमेदवारीवरून उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. त्यावर व्यास यांनी समाजमाध्यमाद्वारे आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन करीत पक्षासाठी काम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे व्यास यांचा विरोध तूर्तास मावळल्याचे दिसून आले असले तरी जैन समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. जैन समर्थकांनी पक्षाचा राजीनामा दिल्यास जैन यांना यंदाची निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.

शहरात भाजपला मानणार्‍या मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने त्यांची मते जैन यांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आणि त्याचा फायदा मेहता यांना होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जरतरच्या राजकारणात मेहता यांनी मात्र पक्षाने उमेदवारी दिल्याचे आभार व्यक्त करीत सर्वांना एकत्र घेऊन यंदाच्या निवडणुकीत विजय मिळविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तर मेहता यांना शह देण्यासाठी जैन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने यंदाची निवडणूक मेहता विरुद्ध जैन यांच्यात रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

मीरा भाईंदर मतदार संघातील भाजपमधील अंतर्गत वाद हा 2019 च्या निवडणुकीत हि रंगला आणि यावर्षीही तोच प्रकार घडत आहे. भाजपने आमदार गीता जैन यांना उमेदवारी नाकारून पुन्हा नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने मुझ्झफर हुसेन यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे तिरंगी अशी चुरशीची लढत होऊन निकाल सांगणे कठीण झाल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT