ठाणे : ग्राहकांना दर्जेदार आणि सकस अन्न पदार्थ मिळावेत यासाठी कार्यरत असलेले अन्न आणि औषध प्रशासन वर्षानुवर्षे कमी मनुष्यबळात काम करते. सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अन्न प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी कार्यरत असल्याने प्रशासनाच्या वतीने ऐन दिवाळीत होणार्या अन्न तपासणीच्या कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळे दिवाळीत ग्राहकांच्या फराळात आणि अन्नात भेसळयुक्त पदार्थांचा भरणा सर्रास होत आहे.
समाजमाध्यमांवर अनेक जागरूक ग्राहक भेसळयुक्त पदार्थ ओळखण्याच्या पोस्ट शेअर करतात, पण ग्राहकांना सणासुदीला तरी भेसळयुक्त आहारापासून मुक्ती मिळण्यासाठी अन्न प्रशासनाने दिवाळीत तरी अन्न पदार्थांची, किराणामाल, सुक्या मेव्याची तपासणी करण्याची गरज आहे.
गेल्या वर्षी एकट्या नवी मुंबईत दिवाळीच्या काळात केलेल्या तपासणीत सुमारे 7 कोटींचा भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त केला होता. यावर्षी अन्न प्रशासनाचे कर्मचारी विधानसभेच्या कामात व्यस्त असल्याने ऐन दिवाळीत कारवाया थंडावल्या आहेत.
ठाणेकरच नाही तर मुंबईकरांमध्ये अन्न धान्य, सुका, मेवा, तेल, मसाल्याचे पदार्थांचे उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते आहेत. याशिवाय मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोडावून, कोल्ड स्टोरेज आहेत.
दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत, तसेच परदेशातून अन्न पदार्थ, किराणा माल, सुक्या मेव्याची आवक गोडावून, कोल्ड स्टोरेजमध्ये होते, तिथून या किराणा मालाचे वितरण घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना होते, त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये या किराणा मालाची होणारी आवक आणि वाढती मागणी लक्षात घेवून अन्न पदार्थांच्या तपासण्या होणे गरजेचे आहे.
दिवाळीत मैदा, रवा, बेसन पीठ, साखर, तेल, तूप, खोबरे, बदाम, काजू, चारोळी, मनुका, पातळ पोहे, भाजके पोहे, डाळ्या, जिरे, मोहरी, मिरची पावडर व अन्य मसाल्याच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर दिवाळीमध्ये मागणी असलेली दिसून येते. मागणीचे प्रमाण लक्षात घेता काही पदार्थांत सर्रास भेसळ केली जाते, हे सार्वत्रिक सत्य असताना अन्न प्रशासन त्याकडे विधानसभा निवडणुकीचे कारण देऊ न कानाडोळा करत आहे. व्यापारी मात्र ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहे.
सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता ग्राहकांना सकस अन्न मिळावे यासाठी अन्न प्रशासनाच्या वतीने ऑगस्ट ते दिवाळीच्या दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन केले जाते, त्यानुसार प्रशासन सतर्क राहून तपासणी मोहीम राबवते. गेल्या वर्षी अन्न प्रशासनाच्या ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील कोल्ड स्टोरेजची तपासणी केली होती. या तपासणीत खारीक, खजूर आणि लवंग काडीचा सुमारे 7 कोटी 27 लाख, 68 हजार 850 रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला होता. नवी मुंबईत सुमारे 50 ते 60 कोल्ड स्टोरेज आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये अन्य देशांमधून आयात होणारे सुक्या मेव्याचे पदार्थ, मसाल्याचे पदार्थ आणि काही प्रमाणात अन्नधान्याचाही साठा असतो, पण या स्टोरेजमधून आणि गोडाऊ नमधून घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडे माल वितरित होतो, त्यात भेसळ आहे की नाही, याची तपासणी करायला अन्न प्रशासनाला वेळ नाही.