महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Thane Election News | शिवसेना विरुद्ध शिवसेना 50 ठिकाणी टशन !

Maharashtra assembly election 2024 : प्रतिष्ठेच्या २५ मतदारसंघांवर लक्ष

पुढारी वृत्तसेवा
ठाणे : शशिकांत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लढवत असलेल्या कोपरी पाचपाखाडीमध्ये ठाकरे गटाकडून केदार दिघे, वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाने उभे केलेले मिलिंद देवरा यामुळे या दोन्ही लढती उत्कंठावर्धक झाल्या आहेत. याशिवाय 50 पैकी बिग फाईट लढती म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करून ४० आमदारांनी केलेले बंड आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे निर्माण झालेले वातावरण, यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदावर असलेले एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी प्रचाराची जोरदार रणधुमाळी महाराष्ट्रात सुरू आहे. हा रणसंग्राम कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आहे. या ५० मध्ये जवळपास २५ ठिकाणी बिग फाईट लढती पाहायला मिळत आहेत

50 पैकी बिग फाईट लढतीमध्ये कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध नीलेश राणे, मुंबई मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर, भांडुप पश्चिममध्ये आ. रमेश कोरगावकर विरुद्ध अशोक पाटील, जोगेश्वरी पूर्वमध्ये रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा विरुद्ध अनंत नर, दिंडोशीमध्ये ठाकरेंचे सुनील प्रभू विरुद्ध शिंदेंचे संजय निरूपम, चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर विरुद्ध तुकाराम काते, माहीममध्ये सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत, भायखळामध्ये यामिनी जाधव विरुद्ध मनोज जामसूतकर, बुलडाण्यात संजय गायकवाड विरुद्ध जयश्री शेळके, मेहकरमध्ये संजय रायमूलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात, बाळापूरमध्ये बळीराम शिरसकर विरुद्ध नितीन देशमुख, कळमनुरीत संतोष बांगर बिरुद्ध संतोष तारफे, परभणीत राहुल पाटील विरुद्ध आनंद भरोसे, सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर, छ. संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे, नांदगावमध्ये सुरेश कांदे विरुद्ध गणेश धात्रक, पालघरमध्ये राजेंद्र गावित विरुद्ध जयेंद्र दुबळा, रत्नागिरीत उदय सामंत विरुद्ध बाळ माने, राजापुरात राजन साळवी विरुद्ध किरण सामंत, सावंतवाडीत दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली, राधानगरीत प्रकाश आबिटकर विरुद्ध के. पी. पाटील, सांगोल्यात शहाजी बापू पाटील विरुद्ध दीपक आबा पाटील, अंबरनाथमध्ये बालाजी किनौकरविरुद्ध राजेश वानखेडे, महाडमध्ये भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप, पैठणमध्ये विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोर्डे या २५ लढती बिग फाईट लढती म्हणून पाहिल्या जात आहेत.

मुंबईत 11 ठिकाणी चुरस

मुंबईत ज्या ११ लढती शिवसेना विरुद्ध शिवसेना होत आहेत, यामध्ये सगळ्याच मतदारसंघात चुरस पाहायला मिळत आहे. ठाकरेंचे विद्यमान आमदार असलेले आदित्य ठाकरे, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, ऋतुजा लटके, प्रकाश फातर्पेकर, सुनील प्रभू, संजय पोतनीस हे निवडणूक रिंगणात आहेत, तर शिंदे गटाकडून राज्यसभेवर असलेले मिलिंद देवरा, माजी आमदार अशोक पाटील, रवींद्र वायकरांच्या पत्नी मनीषा वायकर, माजी खासदार संजय निरूपम, माजी आमदार तुकाराम काते, आमदार असलेले मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दिलीप लांडे असे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.

कोकणात प्रतिष्ठेचे उमेदवार रिंगणात

कोकणात प्रचाराचे जोरदार घमासान पाहायला मिळत असून ठाकरे गटाकडून वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, माजी आमदार बाळ माने, राजन तेली, स्नेहल जगताप, सुभाष भोईर असे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून कोकणात स्वतः एकनाथ शिंदेंबरोबरच माजी खासदार नीलेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, माजी खासदार राजेंद्र गावित असे प्रतिष्ठेचे उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही बाजूकडून प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रचारसभांनी निवडणुकीत रंग

एकूण ५० पैकी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा कोकणात एकूण १४ लढती होत आहेत, तर मुंबईत ११ लढती होत आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात १३ ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्रात ४ ठिकाणी या लढती होत आहेत. एकूण ५० मतदारसंघांमध्ये शिंदे आणि ठाकरे यांच्या प्रचारसभांनी या निवडणुकीत रंग भरला आहे. गद्दारांना गाडा असे सांगत उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरला आहे, तर शिंदेकडून लाडकी बहीण योजना, महिलांना एसटीत मोफत प्रवास आणि विकासकामांना दिलेला निधी यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.

एकमेकांसमोर आव्हान

काय डोंगर काय झाडी... अशा डायलॉगनी गाजलेल्या सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील यांना दीपक आबा साळुंखे या ठाकरे गटाच्या उमेदवाराने मोठे आव्हान उभे केले आहे. दुसरा गाजणारा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर पश्चिम हा असून संजय शिरसाट यांना ठाकरे गटात अलीकडेच प्रवेश केलेल्या राजू शिदे यांनी मोठे आव्हान दिले आहे. रत्नागिरीत उदय सामंतांसमोर रवींद्र ऊर्फ बाळ माने यांनी तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांना भाजपतून ठाकरे गटात आलेल्या राजन तेली यांनी आव्हान दिले आहे

टीकेला शिंदे यांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंनी गद्दारी केलेल्या उमेदवारांच्या मतदारसंघात सभा घेऊन आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. विशेषतः दादा भुसे यांच्या मालेगावमध्ये जाऊन ठाकरे गटाचे उमेदवार अद्वैत हिरे यांच्यासाठी ठाकरेंनी सभा घेतली, यामध्ये जोरदार हल्लाबोल ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरे यांनी दापोलीत संजय कदम यांच्यासाठी सभा घेऊन रामदास कदम यांना आव्हान दिले. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम या मतदारसंघात लढत आहेत. आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना या मतदारसंघात सभा घेऊन उत्तर द्यावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT