ठाणे जिल्हा Pudhari News netowrk
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Thane Assembly Constituency | ठाण्यात बंडखोरांचे मोठे आव्हान

Vidhansabha Election 2024 | महायुतीची सहा मतदारसंघात कसरत

दिलीप शिंदे
ठाणे : दिलीप शिंदे

ठाणे जिल्ह्यात जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर भाजपने 9 जागा, शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविले असून महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट दहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 5, काँग्रेस दोन आणि समाजवादी पार्टी एक जागा लढवीत आहे; मात्र महायुतीअंतगर्त कुरघोडीमुळे बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात शिवसेनेच्या विजय नाहाटा आणि विजय चौगुले या प्रमुख नेत्यांनी बंडखोरी करीत भाजपचे उमेदवार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांना अडचणीत आणले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात नाराजी दूर करण्यास महायुतीच्या नेत्यांना अपयश आल्याने भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी तीन बंडखोरांनी अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस-सपाच्या तीन बंडखोरांचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 244 उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी आठ विधानसभा मतदारसंघात दुहेरी लढती, सहा ठिकाणी तिहेरी आणि चार मतदारसंघांत चौरंगी लढती पाहायला मिळतील.

गोळीबारामुळे कुख्यात झालेल्या कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करीत भाजपला अडचणीत आणले आहे. शिवसनेच्या बंडखोरांमुळे भाजपचे तीन विद्यमान आमदार तर भाजपच्या तीन बंडखोरांमुळे शिवसनेचे तीन आमदार अडचणीत आले आहेत. कल्याण पश्चिममध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माघार घेतली असली, तरी भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने शिवसेनेचे विश्वनाथ भोईर अडचणी वाढल्या आहेत. भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंड केले आहे. या मतदारसंघात जिजाऊ संस्थेने मनीषा ठाकरे आणि ठाकरे गटाकडून महादेव घाटाळ हे रिंगणात असल्याने चौरंगी लढत पाहायला मिळेल. भिवंडी पश्चिममध्ये भाजपचे महेश चौघुले यांच्या विरोधात काँग्रेसने दयानंद चोरगे यांना उतरविले असताना त्यांच्या विरोधात विलास पाटील यांनी बंड केले. सपाचे रियाज आजमी आणि एमआयएमचे माजी आमदार युसूफ पठाण निवडणूक लढवित असल्याने कुणाचीही लॉटरी लागू शकते. भिवंडी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे रूपेश म्हात्रे यांनी माघार घेतल्याने समाजवादी पार्टीचे रईस शेख, शिवसेनेचे संतोष शेट्टी यांच्यात थेट लढत होईल. तशीच लढत मुरबाडमध्ये अपेक्षित असून भाजपचे किसन कथोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुभाष पवार यांच्यात लढत होईल. डोंबिवलीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे, ओवळा माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटाचे नरेश मणेरा, मुंब्रा कळवा मतदारसंघात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला तसेच अंबरनाथमध्ये शिवसेनेचे बालाजी किणीकर आणि ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांच्यातील लढत चुरशीची होईल. वानखेडे यांना मनसेने पाठिंबा दिला आहे. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार राजू पाटील यांना ठाकरे गटाचे सुभाष भोईर आणि शिवसेनेचे राजेश मोरे यांचा सामना करावा लागणार आहे. एकाच मतदारसंघात पहिल्यादांच तीन सेना एकमेकांविरोधात लढणार आहेत. त्यामुळे प्रचाराचा रंग वाढत जाईल तसेतसे मोठा भाऊ कोण, याकरिता पाडापाडीचा संघर्ष अधिक वाढत जाईल.

मीरा भाईंदर मतदारसंघात पुन्हा तिरंगी लढत

मीरा भाईंदर मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार गीता जैन यांना भाजपने उमेदवारी नाकारून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली. त्यामुळे जैन या पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवत असून काँग्रेसने मुझफ्फर हुसेन यांच्यावर विश्वास टाकल्याने होणार्‍या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. कोपरी पाचपाखाडीत काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी ठाकरे गटाचे केदार दिघे यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मार्ग सुकर झाला आहे. मनोज शिंदे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे संबंध सर्वज्ञात असल्याने ही बंडाळी झाल्याचे बोलले जात आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर, ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव, शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा आणि जिजाऊ संघटनेच्या रंजना उघडा यांच्यात तिरंगी लढत होईल. लोकसभा निवडणुकीत जिजाऊंच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT