ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणार्या मतदान प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी घेतला. मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोईचा सामना करावा लागणार नाही व मतदान शांततेत पार पडेल, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने व गांभीर्य लक्षात घेवून काम करण्याचे निर्देश सर्वांना दिले.
ठाणे महानगरपालिका हद्दीत 1 हजार 546 मतदान केंद्रे , कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 1 हजार 261 मतदान केंद्रे, ग्रामीण भागात 1 हजार 124 मतदान केंद्रे, नवी मुंबई महापालिका हद्दीत 831 मतदान केंद्रे, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत 755 मतदान केंद्रे, भिवंडी महानगरपालिका हद्दीत 586 मतदान केंद्रे, उल्हासनगर महानगरपालिका 399 मतदान केंद्रे, तर सर्व नगरपालिका हद्दीत 453 मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रावर पुरविण्यात येणार्या सोईसुविधांची जबाबदारी ही त्या त्या महानगरपालिका, नगरपालिका यांची असून ग्रामीण भागातील मतदान केंद्राची जबाबदारी ही जिल्हा परिषदेकडे आहे. या सर्व मतदान केंद्राची पाहणी ही त्या त्या आस्थापनातील अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून करण्याचे निर्देशही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिले. तसेच त्या मतदान केंद्रावर काही अडचण निर्माण होत असतील तर त्याबाबतची माहिती तात्काळ कळवावी, त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले.या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, महापालिकांचे नगर अभियंता, तसेच ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर सोईसुविधांसाठी कार्यरत असलेले अभियंते उपस्थित होते.
या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील बूथ व त्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या सुविधा याबाबतची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून अभियंत्यांकडून घेतली. तसेच विधानसभा मतदान केंद्राची पाहणी आपण स्वत: तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सूचना फलक, दिशादर्शक, दिव्यांगासाठी रॅम्पची सुविधा, मतदार सहाय्य केंद्र, पुरेशी व्यवस्था, मंडप व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय, रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था तसेच मंडपात असलेल्या मतदान केंद्रानजीक मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, प्रथमोपचार सुविधा, मतदान केंद्रावर पाळणाघर, तसेच दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सुविधा, पार्टीशन मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर लावण्यात येणार्या रांगांसाठी जागेची उपलब्धता आदी सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी नियोजन करावयाचे आहे.