मिरा रोड : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार (दि. 22) रोजीपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवू इच्छिणार्या विविध पक्षांच्या आणि अपक्ष 26 उमेदवारांनी दोन दिवसांत 59 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. आमदार गीता जैन यांनी भाजप, शिवसेना आणि अपक्ष असे तीन उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 22 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानुसार मंगळवारी पहिल्या दिवशी 17 उमेदवारांनी 38 उमेदवारी अर्ज घेतले. तर दुसर्या दिवशी 13 उमेदवारांनी 21 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मीरा-भाईंदर मतदारसंघ भाजपकडे जाणार की शिवसेना शिंदे गट यांच्याकडे जाणार हे कोडे अद्याप सुटलेले नाही. तसेच शिंदे गटाला मतदार संघ गेला तर उमेदवारी कोणाला देणार, भाजपकडे मतदार संघ गेला तर भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार हेदेखील निश्चित झालेले नाही. महायुतीकडून इच्छुक आमदार गीता जैन यांनी भाजप, शिवसेना आणि 2 अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे गीता जैन या भाजप अथवा शिंदे गट, त्याचप्रमाणे वेळ आल्यास अपक्ष म्हणून लढण्याची तयारी असल्याचे दिसून येत आहेत.