रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांचे प्रस्थ आहे. हे प्रस्थ मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसल्याचे दिसून येते. या विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांच्या विरोधात तसाच तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे.स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (शरद पवार गट) शरद पवार लक्ष घालित आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार एवढे निश्चित.
विधानसभा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सुनील तटकरे यांनी या मतदारसंघात मोर्चा बांधणे सुरू केल्यानंतर हा मतदारसंघ सातत्याने त्यांच्या ताब्यात राहिला आहे. या मतदारसंघात स्वतः सुनील तटकरे, त्यांचे पुतणे अवधूत तटकरे आणि आता विद्यमान आमदार आदिती तटकरे हे निवडून आलेले आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत 39622 मतांचे राष्ट्रवादीला मताधिक्य घेऊन आदिती तटकरे निवडून आल्या होत्या. मागील लोकसभा निवडणुकीत खा. सुनील तटकरे यांना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 29872 चा मताधिक्य मिळाला आहे. त्यामुळे आदिती तटकरे या हमखास निवडून येतील अशी चर्चा होत असताना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात जसं जशी निवडणूक जवळ येऊ लागली तसतसे निवडणुकीचे राजकीय गणिते उघडू लागले आहेत.
विद्यमान आमदार व महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू असताना माजी आमदार अवधूत तटकरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे व माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचे नाव पुढे येऊ लागले आहेत. या सर्वात ज्ञानदेव पवार यांचे नाव सध्या अग्रस्थानी आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता कुणबी समाज व मुस्लिम समाज यांची भूमिका महत्त्वाची आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज हा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्वात मोठा समाज या विधानसभा मतदारसंघात कुणबी समाज आहे. कुणबी समाज कोणती भूमिका घेईल याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत विविध राजकीय कलाटण्या श्रीवर्धन मतदारसंघात दिसून येतील. या विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 नामांकन करण्याची शेवटची तारीख आहे.बुधवार 30 ऑक्टोबर 2024 नामांकन छाननीची तारीख आहे.सोमवार 4 नोव्हेंबर 2024 उमेदवारांनी माघार घेण्याची शेवटची तारीख आहे.बुधवार 20 नोव्हेंबर 2024 मतदानाची तारीख आहे. शनिवार 23 नोव्हेंबर 2024 मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात मतदारांची संख्या पाहता 193 श्रीवर्धनसभा मतदारसंघात पुरुष 1 लाख 29 हजार 436 मतदार तर महिला 1 लाख 34 हजार 485 मतदार असे एकूण 2 लाख 63 हजार 921 मतदार आहेत. हेच मतदार विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
एकीकडे महाविकास आघाडी या मतदारसंघात ताकतीने एकत्रितपणे लढण्याची तयारी करत असताना दुसरीकडे महायुतीत मात्र अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. महायुतीत जर अलबेल नसेल तर या निवडणुकीत मात्र चुरस निश्चितच पाहायला मिळेल. त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.