मुंबई : Maharashtra Assembly Polls | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात महायुतीने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपने मांडल्यानंतर रविवारी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील समजला नसला तरी सरवणकर यांनी मात्र निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम ठेवला असल्याची माहिती दैनिक 'पुढारी'शी बोलताना दिली.
सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांना महायुतीने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली होती. त्यानंतर सदा सरवरणकर हे माहीममधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी दादर, प्रभादेवीमधील शिवसैनिक तसेच महिलांनी शाखेबाहेर गर्दी करत सरवणकर यांना पाठिंबा दिला. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.