Sharad Pawar on Maharashtra Politics File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Assembly Election | मुख्यमंत्रिपदावरून ठाकरे-शरद पवार गटात घमासान !

पुढारी वृत्तसेवा

मुंबई / इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध राजकीय कार्यक्रमांत नेते, पदाधिकारी हे आमदार जयंत पाटील यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा करतात. तसेच संकेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिले.

शरद पवार यांच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत घमासान सुरू झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत आणि नेते अनिल परब यांनी त्यास हरकत घेतली आहे. एका पक्षातून किती चेहरे देणार, असा सवाल राऊत यांनी गुरुवारी केला; तर महाविकास आघाडीच सत्तेत येणार असून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असा दावा अनिल परब यांनी केला.

'उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडविण्याचे, चुकीच्या दिशेने चाललेल्या राज्याला सावरण्याचे सामर्थ्य आणि तसे नेतृत्व जयंतरावांकडे आहे', असे शरद पवार यांचे शब्द होते. क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्यसेनानींचा वारसा जपणाऱ्या जयंतरावांवर राज्य सावरण्याची जबाबदारी मी टाकत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. बुधवारी रात्री इस्लामपूर येथे भरपावसात शिव स्वराज्य यात्रेची सांगता सभा झाली. मुसळधार पावसानंतरही सभेला तुफान गर्दी होती.

शरद पवार यांनी दिलेल्या संकेतामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आमदार जयंत पाटीलही असतील, यावर मंथन सुरू झाले. शरद पवार यांच्यासह आ. जयंत पाटील व राष्ट्रवादीचे अन्य नेते मंचावर येताच आ. जयंत पाटील यांच्या नावाचा 'भावी मुख्यमंत्री' म्हणून जयघोष सुरू झाला. ते भाषणासाठी उभे राहिल्यावरही उपस्थितांमधून पुन्हा असा जयघोष सुरू झाला.

आपल्या भाषणाची सुरुवात करताच, घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी खूप उठा-बशा काढाव्या लागतात, असे वक्तव्य आ. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले. हाच धागा पकडत खा. अमोल कोल्हे यांनीही, आ. जयंत पाटील 'वर्षा' बंगल्यावर जावेत, अशी आमचीही इच्छा आहे, असे वक्तव्य केले.

कोल्हे म्हणाले, खा. पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही लढत राहिलो. ही लढाई महाराष्ट्र धर्म वाचविण्याची आहे. अनेकांना वाटत होते, पक्ष गेला, चिन्ह गेले. ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, ते नेते बाजूला गेले. आता पक्ष शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत पक्षाला सावरले. सभेच्यावेळी आलेल्या पावसाचेही सांगणे आहे की, जयंत पाटील यांनी 'वर्षा' बंगल्यावर जावे, ती वेळ आली आहे. मविआचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील : परब दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.

आमचे सरकार येण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील, असे माजी परिवहन मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी ठणकावून सांगितले. एका कार्यक्रमात परब यांनी हे वक्तव्य केले. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार यावरून गेले अनेक महिने वाद सुरू असताना परब यांनी केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे आघाडीत विघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

एका पक्षात दोन मुख्यमंत्री होणार नाहीत संजय राऊत पवारांच्या घोषणेने राजकीय हादरा बसलेल्या शिवसेना ठाकरे गटाने सावध प्रतिक्रिया दिली. पवारांचे तसे संकेत असतील तर त्यावर आम्ही चर्चा करू. पण पवार कुठला संकेत देत नाहीत. एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत. अनेकांची नावं चालू आहेत. हे शेवटी राजकारण आहे.

लोक कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार आहे हे अख्खा देश जाणतो. त्यासाठी घोषणा करायची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्याच चेहऱ्याकडे पाहून मतदान होईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री संख्याबळानुसार ठरेल : नितीन राऊत शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही सावध प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असे शरद पवारांनी म्हणण्यात वावगे काही नाही. याला मुख्यमंत्रिपदासाठी एखादे नाव पुढे करणे असल्याचे म्हणता येणार नाही. निकालानंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरेल. काँग्रेस पक्षात हा निर्णय राज्य पातळीवर नव्हे तर नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जयंतरावांच्या पाठीशी शक्तिनिशी उभे राहू : पवार

याच भागाच्या सुपुत्राच्या हातामध्ये महाराष्ट्र बहरण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी आपण टाकतोय. मी आणि राष्ट्रवादीचे आमचे सर्व सहकारी आणि महाराष्ट्राची तरुण पिढी शक्तिनिशी त्यांच्या पाठीशी उभी राहील, हा दिलासा आणि विश्वास याठिकाणी देतो, असे खा. शरद पवार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT