वाडा : मच्छिंद्र आगिवले
शहापूर विधानसभा मतदार संघात वाडा तालुक्यांतील दुर्गम व ग्रामीण भागासह शहापुर तालुक्यांतील ग्रामीण भागाचा सहभाग मोठा आहे. पाच वर्षांनी येथे सत्तापरिवर्तन होते असा इतिहास असल्याने मिळालेली सत्ता उमेदवार नेमका कुणासाठी वापरतो हे अजूनही मतदारांना समजू शकले नाही. म्हणूनच उमेदवारांना प्रचारात येथे टोकाचा संघर्ष करावा लागतो. विद्यमान आमदारांनी या भागात मोठा निधि खर्च केला असे सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात अनेक वर्षापासून बोगस व निकृष्ट कामांमुळे विशेषतः वाडा तालुक्यांतील ग्रामीण भाग पोखरला आहे असा विरोधकांचा आरोप आहे.
महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( अजित पवार ) गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा दुसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा ( शप ) त्यांचा सामना करणार आहेत. आलटून पालटून याचं दोघांच्या खांद्यावर मतदार संघाची धुरा दिली जाते असा इतिहास असून हा शिवाशिविचा खेळ असाच सुरु रहावा यासाठी अन्य उमेदवारांना स्पर्धेत येऊच दिले जात नाही असे बोलले जाते. शहापुर तालुक्यात उबाठा गटाची ताकत मोठी असून शरद पवार यांचेही खास प्रेम या तालुक्यावर पूर्वीपासून आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनाही या मतदासंघात मोठे मताधिक्य मिळाले आहे. दुसरीकडे भाजपा, सेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्याने दोघांची ताकत समसमान आहे.विद्यमान आमदारांनी मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी दिल्याचे व याचं विकासाच्या मुद्द्यांवर प्रचाराची धुरा असली तरी यातील किती निधी सार्थकी लागला आहे हे तपासावे लागेल असे माजी आमदार सांगतात. बोगस व निकृष्ट रस्ते, रोजगाराची बोंबाबोंब, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची वणवण, आश्रमशाळांची दुर्दशा, आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा अशा अनेक समस्यांमुळे जनता त्रस्त असल्याचे आरोप केले जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर विकासकामे मंजूर करून ज्यांचे भूमिपूजन करण्यात आले आहे की बदलाचा इतिहास पुन्हा अंमलात येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.