पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएम (EVM) वर शंका उपस्थित केली. त्यावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही हिमाचलमध्ये निवडणूक हरलो, तेव्हा कोणीही ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. आम्ही हरलो, आम्हीदेखील आक्षेप घेतला नाही. महाराष्ट्रात जनतेने त्यांना नाकारले आहे. जेव्हा जेव्हा आमच्या बाजूने जनादेश मिळतो. तेव्हा ते आक्षेप घेतात. यामुळे ईव्हीएम हॅक करता येत असेल तर जाहीररीत्या हॅक करून दाखवा. कोणी मोठे इंजिनिअर असतील तर त्यांनी ईव्हीएम हॅक होते हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान दानवे यांनी विरोधकांना दिले आहे.
सरकार स्थापनेबाबतच्या घडामोडींवर बोलताना दानवे म्हणाले की, आमच्या पक्षात कोणताही वाद नाही. आमचा गटनेता लवकरच निवडला जाईल. महायुतीतील तिन्ही पक्षांत योग्य समन्वय आहे. तिन्ही पक्षात कसलेही मतभेद नाहीत. तीन पक्ष सरकार बनवतात तेव्हा समन्वय आवश्यक असतो. सरकार स्थापनेसाठी विलंब झालेला नाही. आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही. खाते वाटप, नेता निवडीवरून आमच्यात कोणतेही वाद नाहीत.
एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर दानवे म्हणाले, ''हे त्यांचे मत असून पण कोणाला पद द्यायचे हे वरिष्ठ ठरवतील.''
महाराष्ट्र निवडणूक मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या आरोपांवर चर्चा करण्यासाठी आयोगाने ३ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेस (INC) शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे. तसेच सर्व कायदेशीर शंकांचे निरसन करणार असल्याचे आश्वासन देखील निवडणूक आयोगाने दिल्याचे वृत्त ANI ने दिले आहे.
दरम्यान,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएम विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलाना जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे.