भिलार : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून स्व. मदनआप्पा यांनी राजकारण आणि समाजकारण केले. त्यांच्या समाजकारणाचा वसा आणि वारसा पुढे चालवताना त्यांना अभिप्रेत असणारा विकास करण्याचे ध्येय घेवून आम्ही वाटचाल करु, अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सौ. अरुणादेवी पिसाळ यांनी दिली.
वाई मतदार संघातील प्रचारादरम्यान पाचगणी बाजारपेठेत सौ. अरूणादेवी पिसाळ यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ. अरूणादेवी पिसाळ म्हणाल्या, तीन टर्म आमदार असूनही त्यांना पाचगणी शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावता आलेला नाही. धोम धरणाचे पाणी इथे आणतो, हे आश्वासन हवेत विरले आहे. पाचगणी हे शैक्षणिक हब आहे. तसेच पर्यटन हब असूनही अपेक्षित अशी कामे येथे आमदारांनी केलेली नाही. तसेच शैक्षणिक व पर्यटनाचा आराखडा त्यांचा कागदावरच आहे. याचबरोबर पार्किंग व वाहनतळाचा विषयही पेंडिंग आहे. इतके वर्ष ते आमदार असतानाही महाबळेश्वर व पाचगणी येथील दोन्ही शहरांमधील गट-तट कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. महाबळेश्वरचा आराखडा मंजूर केला म्हणून याचे श्रेय ते घेत आहेत. मात्र, महाबळेश्वरचे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा आरखडा प्रत्यक्षात आला. तोपर्यंत या आमदारांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी काय केले? असा सवालही सौ. अरूणादेवी पिसाळ यांनी केला.
नीरा देवधर धरणाच्या पाण्यामुळे तब्बल 27000 एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच वाई मतदारसंघाच्या हक्काचे पाणी दुसर्या तालुक्याला गेले. ज्यांना 15 वर्षात जलसिंचन उपसा योजना मार्गी लावता आल्या नाहीत. त्यांना पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले नाहीत. खंडाळा तालुका व वाईच्या पूर्वेकडील शेतकरी अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. वाईतील ज्या योजना आहेत त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यांच्याकडून दुष्काळमुक्तीच्या केवळ वल्गना केल्या जात आहेत, असा हल्लाबोलही अरूणादेवी पिसाळ यांनी केला.