कुडाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नीलेश नारायण राणे यांनी 8 हजार 176 मताधिक्य घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव केला. नीलेश राणे यांना कुडाळ तालुक्यातून 48,205 मते मिळाली तर वैभव नाईक यांना 44,493 मते मिळाली. नीलेश राणे यांना कुडाळ तालुक्यात 3 हजार 712 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. नीलेश राणे यांच्या या विजयामुळे कुडाळमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा राणेपर्व सुरू झाले आहे. दरम्यान नीलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे व त्यांच्या विजयामुळे कुडाळ मतदारसंघात शिंदे शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला होता. मात्र सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी पराभव करत नारायण राणेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. 2019 मध्येसुद्धा नारायण राणे यांचे शिलेदार रणजित देसाई यांचा वैभव नाईक यांनी पराभव केल्याने गेली 10 वर्ष वैभव नाईक कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय पटलावर अनेक स्थित्यंतरे झाली. अडीच वर्षांपूर्वी अखंड शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे फुटली. त्यानंतर आधी लोकसभा व त्या पाठोपाठ अवघ्या चार महिन्यांत विधानसभा निवडणूक पार पडली. या विधानसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वैभव नाईक तिसर्यांदा रिंगणात उभे होते. त्यांच्या विरोधात कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपा प्रचारप्रमुख नीलेश राणे यांनी अंतिम क्षणी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत वैभव नाईक यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले. त्यामुळे कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लक्षवेधी लढत रंगली. या लक्षवेधी लढतीत नीलेश राणे 8 हजार 176 मते घेऊन विजय झाले. या विजयात कुडाळ तालुक्यातील जनतेने नीलेश राणे यांना 48 हजार 205 मते दिली, तर वैभव नाईक यांना 44 हजार 493 मते दिली. एकूणच कुडाळ तालुक्यात 3 हजार 712 मतांचे लीड नीलेश राणे यांना मिळाले आहे.
कुडाळ तालुक्यातील आंब्रड, कुपवडे, जांभवडे, घोडगे, भरणी, भरणी आगार, जांभवडे, भूतवड, भडगाव, पोखरण, कुसबे, कुंदे या भागात नीलेश राणे यांना 247 मतांचे मताधिक्य मिळाले, तर कुसबे, जांभवडे भूतवड, आंब्रड या केंद्रांवर वैभव नाईक यांनी मतांची आघाडी घेतली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांना या ठिकाणी अधिक मते मिळाली होती. कसाल, पडवे गावराई, रानबांबुळी, ओरोस बुद्रुक या भागात नीलेश राणे यांना लोकांनी अधिक पसंती दर्शवत वैभव नाईक यांच्या तुलनेत जवळपास 211 अधिक मताधिक्य दिले. जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील दोन केंद्रांवर मात्र वैभव नाईक यांना 24 मतांचे मताधिक्य मिळाले. या ठिकाणी नीलेश राणे यांना कमी मतदान झाले.
ओरोस खुर्द, वर्दे कडावल, निरुखे, पांग्रड, गिरगाव, कुसगाव, हिर्लोक, किनळोस, आवळेगाव, टेमगाव, डिगस, कारिवणे, हुमरमळा, अणाव या भागात नीलेश राणे यांनाच मतांची आघाडी आहे. मात्र मागील निवडणुकीत या ठिकाणी वैभव नाईक यांना आघाडी मिळाली होती. अणाव, बांव, सोनवडे तर्फ हवेली, सरंबळ, बांबुळी, पणदूर, बांबुळी तर्फ कळसुली, नारूर क. नारुर या ठिकाणी नीलेश राणे यांना 652 मतांचे मताधिक्य आहे. नेरूर कर्याद नारुर, अंजिवडे, शिवापूर, वसोली, उपवडे, पुळास, चाफेली केरवडे क. नारुर या भागात नीलेश राणे यांना 270 मतांची आघाडी आहे. हा संपूर्ण भाग वैभव नाईक यांना मागील विधानसभा निवडणुकीत प्लसमध्ये होता. पावशी केंद्रावरसुद्धा दोन केंद्रांवर नीलेश राणे यांना आघाडी आहे. चेंदवण, वालावल या ठिकाणी वैभव नाईक यांना 18 मते अधिक आहेत. कुडाळ शहरातसुद्धा वैभव नाईक यांच्यापेक्षा नीलेश राणे यांनी मतांमध्ये आघाडी घेतली आहे. माणगाव हा वैभव नाईक यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माणगाव खोर्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांना नाकारले होते, तरीपण वैभव नाईक यांना मात्र विधानसभा निवडणुकीत जनतेने साथ दिली. त्यामुळे नीलेश राणे यांचे माणगावमध्ये मताधिक्य घटले. साळगाव, झारापमध्ये मात्र नीलेश राणे अधिक मताधिक्य घेण्यात यशस्वी झाले आहेत.
कुडाळ तालुक्यातील 157 बुथपैकी 63 बुथवर वैभव नाईक यांनी आघाडी घेतली. मात्र 94 बुथवर नीलेश राणे यांना मतदारांनी अधिक पसंती दर्शवली आहे. एकूणच तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना जवळपास 26 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला होता. त्या तुलनेत शिवसेना ठाकरे गट तथा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास नव्हता. त्यातच लाडकी बहीण योजना, बटेंगे तो कटेंगे आदी घोषणा देत महायुतीने मतदारसंघात चांगल्यापैकी प्रचार केला होता. सभांपेक्षा प्रत्येक मतदार आपल्या कक्षेत कसा येईल, याकडेच महायुतीच्या नेत्यांनी अधिक लक्ष दिले होते. स्वतः महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांनी माध्यमांसमोर न येता मतदारांच्या गाठीभेटी अधिक कशा घेता येतील, याकडे अधिक लक्ष दिले.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांनी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची माणगावमध्ये सभा घेतली. उपनेते सुषमा अंधारे यांची कुडाळमध्ये सभा घेऊन चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती केली, मात्र अपेक्षेप्रमाणे त्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होऊ शकले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनीसुद्धा प्रचारात कमी वेळ दिला त्यामुळेसुद्धा काही मतांमध्ये फरक पडला की काय, अशीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. एकूणच महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी प्रत्येक मत आपल्या कक्षेत कसे येईल, याकडे काटेकोर लक्ष दिले. मात्र त्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते उजवे ठरल्याने कुडाळ तालुक्यात नीलेश राणे यांना 3 हजार 712 चे मताधिक्य मिळाले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव करून सन 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेल्या वैभव नाईक यांनी, त्यानंतर सन 2019 च्या निवडणुकीत रणजित देसाई यांचा पराभव केला. दहा वर्षे आमदार म्हणून काम करताना त्यांची सर्वसामान्य आमदार अशी ओळख झाली होती. केव्हाही उपलब्ध असणारा आमदार अशी बिरुदावली त्यांना मतदारांनीच दिली. असे असताना त्यांचा नीलेश राणे यांनी पराभव केला. वैभव नाईक यांनी त्यांच्या वडिलांचा पराभव केला होता. आता त्यांच्या मुलाने वैभव नाईक यांचा पराभव केला आहे.
कुडाळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे नीलेश राणे, महाविकास आघाडीचे वैभव नाईक, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अनंतराज पाटकर, बहुजन पार्टीचे रवींद्र कसालकर व अपक्ष उज्ज्वला यळावीकर रिंगणात होते. यामध्ये अनंतराज पाटकर, रवींद्र कसलकर व उज्ज्वला यळावीकर या तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.