मनसेच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‌घाटनप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी : ठाण्यातून अविनाश जाधव

Maharashtra Assembly Polls |मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोंबिवलीत घोषणा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मनसे उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. दुसरी यादी आज-उद्या जाहीर होईलच, तत्पूर्वी ठाण्यातून अविनाश जाधव, तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते तथा विद्यमान आमदार राजू पाटील यांना उमेदवारी आपण जाहीर करत आहोत, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी डोंबिवलीत बोलताना केली. राजू पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करताच उपस्थित राजसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून सभा मंडप परिसर दणाणून सोडला. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, मी इथे भाषणासाठी आलो नसून माझ्या राजू पाटीलच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलो आहे. मतदार यादीवर शेवटचा हात फिरवत आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.

कल्‍याण ग्रामीण मतदारसंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदारांना संपर्क साधता यावा, याकरिता कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या कै. भागाशेठ वझे चौकात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमेदवार राजू पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोद पाटील, शहरप्रमुख राहुल कामत, माजी अध्यक्ष मनोज घरत, यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्‍थित राहणार

२४ ऑक्टोबर रोजी आपण राजू पाटील आणि अविनाश जाधव या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाणे आणि डोंबिवलीत येणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. राजू पाटील यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर करताच राजसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज ठाकरे यांना श्रीरामांची भव्य प्रतिमा भेट

यावेळी राजू पाटील यांनी ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी आणि प्रभू श्रीरामांची भव्य अशी प्रतिमा भेट दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे हे आज उमेदवारी जाहीर करतील, असे अपेक्षित नव्हते. आज सोनेपे सुहागा असेच झाले. मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करेल. लोकसभेला दिलेला पाठींबा हा मोदींना दिलेला होता. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून पाठींबा दिला होता. महायुतीला नव्हता. महायुतीने आम्हाला पाठिंबा दिला तरी चांगलेच आणि नाही दिला तरी चांगले, असेही पाटील म्हणाले.

मुद्दे आणि गुद्दे सोबत घेऊनच निवडणूक लढणार

उमेदवारी जाहीर केल्याबद्दल राजू पाटील यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यासाठी जातात तिकडे उमेदवारी जाहीर करत असून कल्याण ग्रामीण आणि ठाण्याची उमेदवारी जाहीर केली आहे. तर ही निवडणूक लढण्यासाठी मुद्दे भरपूर आहेत, मुद्दे आणि गुद्दे सोबत घेऊनच निवडणूक लढणार आहे, पाच वर्षात तीन मुख्यमंत्री, दोन-तीन राज्यपाल पाहिले आहेत. कोव्हीडमध्ये सुरू असलेले राजकारण या गोष्टी लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे विकासकामांचा उडालेला बोजवारा, बिघडलेली राजकीय संस्कृती हे सर्व लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे राजू पाटील म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT