नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करू शकतात. महाविकास आघाडीचे (मविआ) उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा हा प्रचार सुरू होईल. मात्र, काँग्रेस मित्रपक्षांसोबत प्रचार सुरू करणार की स्वतंत्र प्रचाराला सुरुवात करणार हे अद्याप ठरलेले नाही. महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीर सभेतून प्रचाराची सुरुवात करायचा विचार सुरु आहे. जर संयुक्त प्रचार सभा घेण्याचे ठरले तर मग मुंबईतून प्रचाराला सुरुवात होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान द्यायचे आहे. त्यामुळेच राहुल गांधींची पहिली पसंती नागपूरला आहे. राहुल गांधींना त्यांच्या प्रचाराची सुरुवात नागपुरातून करायची आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, उमेदवारांची घोषणा होताच प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. मविआने एकत्रित निवडणूक प्रचाराची रणनीती पुढे नेल्यास पहिली जाहीर सभा मुंबईत होऊ शकते. ज्यामध्ये मविआ घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र संयुक्त प्रचाराऐवजी स्वतंत्र प्रचाराची रणनीती ठरली, तर अशा स्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेसची पहिली जाहीर सभा नागपुरात होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये नागपुरात जाहीर सभेला संबोधित केले होते. एवढेच नाही तर अमेरिका दौऱ्यातही त्यांनी भाजपला टोला लगावताना नागपूरचा उल्लेख केला होता.