Maharashtra Assembly Polls | कोकणातील दिग्गज नेते एका पक्षात, तर त्यांची मुले दुसर्याच पक्षात असा नवा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नारायण राणे हे भाजपचे नेते आहेत ते केंद्रात मंत्री सुद्धा होते. आता ते रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजपचे खासदार आहेत; तर त्यांचे चिरंजीव माझी खासदार डॉ. नीलेश राणे हे आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
दुसर्या बाजूला नवी मुंबईत गणेश नाईक यांना भाजपने ऐरोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. ते बेलापूरमधून भाजपच्या मंदा मात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. तिसर्या बाजूला सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे पेण विधानसभेतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एकंदरीत नव्या राजकीय समीकरणांमुळे मतदारही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. (Maharashtra Assembly Polls)
राजकीय नेत्यांची दिशा वेगळी त्यांच्या मुलांची दिशा वेगळी, हे चित्र केवळ कोकणात आहे, असे नाही, तर उत्तर महाराष्ट्रात नरहरी झिरवाळ हे सध्या अजित पवार गटात आहेत तर त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन निवडणूक लढवणार आहेत. दिंडोरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगा हा सामना पाहायला मिळणार आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे हे कुठल्या पक्षात आहेत, याचा पत्ता अजून लागलेला नाही. ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते; मात्र त्यांचा प्रवेश भाजप गिरीश महाजन यांनी अडवला. त्यानंतर ते ना भाजपमध्ये ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत. अशा अवस्थेत मधेच थांबलेले आहेत. ते सध्या शरद पवार गटाकडून विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांची सून रक्षा खडसे भाजपची खासदार असून, सध्या केंद्रीय मंत्रिपदावर आहे. तर त्यांची कन्या रोहिणी खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. (Maharashtra Assembly Polls)
महाराष्ट्रात अनेक राजकीय घराण्यांमध्ये स्वकीय गोंधळ हा याशिवाय आणखीही काही मतदारसंघांत पाहायला मिळत आहे. वडील एका पक्षात तर मुलगी दुसर्या पक्षात अशा लढतीही महाराष्ट्रात होऊ घातल्या आहेत. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटातून तर त्यांची कन्या गायत्री शिंगणे या अजित पवार गटाकडून लढणार आहेत. बारामती मध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा काका पुतण्याचा सामना रंगणार आहे. राज्यातील या घराण्यामध्ये लढती लक्षवेधी ठरणार आहेत. धर्मरावबाबा अत्रामविरुद्ध भाग्यश्री अत्राम, जयदत्त क्षीरसागरविरुद्ध संदीप क्षीरसागर, नीलय नाईकविरुद्ध इंद्रनील नाईक, अशा राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी लढती महाराष्ट्रात लक्षवेधी ठरतील. महाराष्ट्रात एका बाजूला महाविकास आघाडी, मनसे तिसरी आघाडी, अशा पंचरंगी लढती असताना त्या अधिक लक्षवेधी ठरू लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Polls)