नाशिक : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विमानाने नाशिकमध्ये प्राप्त झालेल्या तीन एबी फॉर्मची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिक गाजण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील विधानसभेच्या पंधरा जागांसाठी सोमवारी (दि. ४) माघारीची अंतिम मुदत आहे. पण, माघारीपूर्वीच जिल्ह्यात खास विमानाने दाखल झालेल्या एबी फाॅर्मची चर्चा सुरू झाली आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी (दि.२९) शिवसेना शिंदे गटाने देवळाली व दिंडोरी तसेच इगतपुरीतील उमेदवारांसाठी खास विमानाने एबी फॉर्म धाडले. यापैकी इगतपुरीवगळता अन्य दोन्ही ठिकाणी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्म जोडला. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीत वादाला तोंड फुटले आहे. नांदगावनंतर आता देवळाली तसेच दिंडोरीत बंडखोरी झाल्याने युतीच्या अधिकृत उमेदवारांंसमोर अडचणीत भर पडली आहे.
शिंदे सेनेतर्फे उमेदवारांसाठी विमानाने पाठविलेल्या एबी फाॅर्मसंदर्भात वर्तमानपत्रात प्रसिद्ध बातम्यांची दखल थेट आयोगाने घेतली आहे. या प्रकारावरून प्रशासनाला धारेवर धरताना विमान कोणासाठी आले, त्यामध्ये किती लोक होते, कोणत्या उमेदवारांचे त्यात एबी फॉर्म होते, विमानाचा खर्च आदी लांबलचक प्रश्नांची यादीच आयोगाने वाचून दाखविली आहे. आयोगाच्या या झाडाझडतीनंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन चौकशीला लागले आहे. या चौकशीतून काय तथ्य समोर येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले.
विमानाने आणलेल्या एबी फॉर्मची चर्चा राज्यभरात रंगली आहे. पण, ज्यांच्यासाठी हे एबी फॉर्म आले ते उमेदवार अडचणीत येऊ शकतात. प्रशासनाच्या चाैकशीत विमानाने एबी फॉर्म आल्याचे समोर आल्यास संबंधित विमानाचा व अन्य खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात वर्ग केला जाऊ शकताे. त्यामुळे अगोदरच निवडणुकीत ४० लाखांच्या खर्चाची मर्यादा असताना विमानाचा खर्च सदर उमेदवारांसाठी परवडणार नाही.