साखरवाडी येथील प्रचारसभेत बोलताना खा. धैर्यशील मोहिते-पाटील. Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

साहेबांच्या प्रेमामुळे लोकांनी अजितदादांना सहन केले : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

Maharashtra Assembly Polls | त्यांच्याकडे कारभार येताच राष्ट्रवादीची उलटी गिनती सुरू

पुढारी वृत्तसेवा

साखरवाडी : फलटण व अकलूज तालुक्यातील जनता तसेच मोहिते पाटील व निंबाळकर घराण्याने पवारसाहेबांवरील प्रेमामुळेच तुम्हाला आतापर्यंत सहन केले. 2004 साली विजयसिंह मोहिते-पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री होते व आर. आर. पाटील प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रवादी पक्षाचा सर्वात मोठा परफॉर्मन्स त्यावेळेचा असून त्यावेळी राज्यात राष्ट्रवादीचे 72 आमदार निवडून आले होते. जसा शरद पवारांनी तुमच्याकडे कारभार दिला तशी राष्ट्रवादीची उलटी गिनती सुरू झाली, असा टोला खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना लगावला.

साखरवाडी येथे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, शंकरराव माडकर, सह्याद्री कदम, महेंद्र बेडके, सतीश माने, शंभुराज खलाटे, नितीन शाहूराजे भोसले उपस्थित होते.

खा. मोहिते म्हणाले, अजितदादांनी कायमच विरोधी पक्षातील लोकांबरोबर भांडण्याऐवजी जे शरद पवारांसोबत निष्ठावंत आहेत त्यांचे कायमच पाय ओढायचे राजकारण केले. हे राज्याचे नेते आहेत की ग्रामपंचायतीचे नेते हेच मला कधी कधी कळत नाही. ग्रामपंचायतीच्या नेत्याप्रमाणे यांची सतत सदस्यांची ओढाओढ सुरू असते. तुम्ही श्रीराम कारखान्याबद्दल बोलता तो रामराजेंनी चालवायला दिला. मात्र, विकला तर नाही ना. तुम्ही मात्र जरंडेश्वर कितीला घेतला, हे लोकांना कधी सांगणार, असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

राजकारणाचा बट्ट्याबोळ करणार्‍यांचा समूळ नायनाट करा : संजीवराजे ना. निंबाळकर

संपूर्ण राज्यभरात आपण आपल्याच लोकांमध्ये भांडत बसलोय. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीसुद्धा आहेत. शरद पवार अजित पवारांवर टीका करत आहेत. मात्र, हे सर्व कुणी घडवलं. आपण सर्व एकत्रित कामे केलेली माणसं आहोत. महाराष्ट्रातील राजकारणाचा खर्‍या अर्थाने बट्ट्याबोळ कोणी केला आहे, हे शोधून त्याचा समूळ नायनाट करण्याचे काम आपल्याला येत्या 20 तारखेला करायचे आहे. त्या अनुषंगाने दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवा, असे आवाहन संजीवराजे ना. निंबाळकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT