सातारा जिल्हा हा शरद पवारांचा असलेला बालेकिल्ला महायुतीने भुईसपाट करून उद्ध्वस्त केला. Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

पवारांचा बालेकिल्ला महायुतीकडून उद्ध्वस्त

8-0 ने मविआचे पानिपत : बलाढ्य नेते पराभूत; तीन ठिकाणी परिवर्तन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून सातारा जिल्हा हा शरद पवारांचा असलेला बालेकिल्ला महायुतीने भुईसपाट करून उद्ध्वस्त केला. जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत महाविकास आघाडीला ‘व्हाईट वॉश’ मिळाला असून 8-0 ने मविआचे पानिपत झाले.

जिल्ह्यातील सातारा, माण, कराड उत्तर, कराड दक्षिण या चार मतदारसंघांवर भाजपचे कमळ फुलले असून शिवसेना शिंदे गटाने पाटण व कोरेगाव या मतदारसंघांवर पुन्हा कब्जा मिळवला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वाई व फलटणमध्ये बाजी मारली. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण या मविआच्या मातब्बर आमदारांचा दारूण पराभव झाला. सातार्‍यातून आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजार 124 एवढे विक्रमी मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. काही मतदारसंघांत घासून विजय मिळेल, ही चर्चा फोल ठरुन महायुतीच्या उमेदवारांनी विरोधकांचा ठासून पराभव केला.

सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सार्‍यांच्या नजरा लागल्या होत्या. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर काही वेळातच कल दिसू लागला. कराड उत्तर, कराड दक्षिण, फलटण या तीन मतदासंघांत परिवर्तन घडून आले. कराड उत्तरमध्ये 25 वर्षांनंतर, कराड दक्षिणमध्ये 10 वर्षांनंतर तर फलटणमध्ये 15 वर्षांनंतर विद्यमान आमदारांना घरी बसावे लागले. सातार्‍यातून आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजार 124 एवढे विक्रमी मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात आ. शिवेंद्रराजे भोसले यांना 1 लाख 76 हजार 849 मते मिळवली. प्रमुख विरोधी उमेदवार अमित कदम यांना केवळ 34 हजार 725 मते मिळाली.

काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून पराभवाला सामोरे जावे लागले. या मतदारसंघामध्ये डॉ. अतुल भोसले यांनी पहिल्यांदाच कमळ फुलवत पृथ्वीराज चव्हाण यांचा 39 हजार 355 मताधिक्क्याने पराभव केला. डॉ. अतुल भोसले यांना 1 लाख 39 हजार 505 मते मिळाली तर पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते मिळाली. कराड उत्तरमध्ये 25 वर्षे मांड ठोकून बसलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांना पराभवाचा दणका देत भाजपच्या मनोज घोरपडे यांनी बाजी मारली. मनोज घोरपडे यांनी 43 हजार 691 एवढे मताधिक्य घेत आ. पाटील यांना पराभवाचे पाणी पाजले. मनोज घोरपडे यांना 1 लाख 34 हजार 626 मते मिळाली तर बाळासाहेब पाटील यांना 90 हजार 935 मते मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT