रायगडमध्ये जुन्या आणि नव्या चेहऱ्यांत लढती file photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

रायगडमध्ये जुन्या आणि नव्या चेहऱ्यांत लढती

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगडमध्ये महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल आणि उरण हे सात विधानसभा मतदार संघ असून, सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे तीन, भाजपचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक आमदार आहेत. येणाऱ्या विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाकडून महाड, कर्जत आणि पेण या जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे, तर शेकाप अलिबाग, उरण व पनवेलची जागा मागणार आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार देण्याची शक्यता आहे. परिणामी, इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मोठी रस्सीखेच होणार आहे. (Assembly Election 2024)

महायुतीकडून महाडमध्ये आ. भरत गोगावले, श्रीवर्धनमध्ये मंत्री आदिती तटकरे, पनवेलमध्ये आ. प्रशांत ठाकूर, पेणमध्ये आ. रवींद्र पाटील वा त्यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील, कर्जतमध्ये आ. महेंद्र थोरवे, उरणमध्ये आ. महेश बालदी तर अलिबागमध्ये आ. महेंद्र दळवी हेच चेहरे रिंगणात उतरवणार, असे चित्र आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नवे चेहरे रिंगणात येणार आहेत. यात अलिबागमध्ये शेकापच्या चित्रलेखा पाटील, माजी आमदार पंडित पाटील व अॅड. आस्वाद पाटील यांची नावे आहेत. पनवेलमध्ये शेकापचे बाळाराम पाटील, उरणमध्ये शेकापचे प्रीतम म्हात्रे, कर्जतमध्ये शिवसेना ठाकर गटाचे नितीन सावंत रिंगणात येणार, असे चित्र आहे. दरम्यान, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट वा शिवसेना ठाकरे गट उमेदवार देणार, तर महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप, पेणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन व शेकापचे प्रमोद पाटील इच्छुक आहेत.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये उरण, महाड, कर्जतमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे, तर श्रीवर्धन व पनवेलमध्ये महायुती भक्कम मानली जात आहे. पनवेलमध्ये महायुतीतील भाजपचे प्रशांत ठाकूर हे आमदार आहेत. यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील हे मैदानात उतरणार आहेत. शेकाप, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसचे या मतदार संघात हक्काचे मतदार आहेत. पण गेल्या दहा वर्षांत भाजपने आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून या व्होट बँकेला छेद दिला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत ठाकूर यांच्या झंझावातापुढे पाटील हे किती तग धरू शकतात, हे दिसून येईल. ठाकूर यांनीही विकास कामांच्या माध्यमातून मतदार संघात विकासनिधी आणला आहे. होऊ घातलेले विमानतळ, सिडकोच्या माध्यमातून होत असलेला विकास ही त्यांची जमेची बाजू आहे. तर सरकारविरोधातील नाराजी, प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले प्रश्न, विमानतळ नामांतरण आदी मुद्दे मविआतर्फे उपस्थित केले जाऊ शकतात. लोकसभेला महायुतीचे खा. श्रीरंग बारणे यांना येथे मताधिक्य मिळाले होते.

उरणमध्येही अशीच लढत अपेक्षित आहे. आ. महेश बालदी विरुद्ध शेकापचे प्रीतम म्हात्रे यांच्यात संभाव्य लढत होणार असल्याची चर्चा आहे. रायगड जिल्हा याशिवाय माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे महेंद्र घरत यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामधून कुणाला उमेदवारी मिळते, यावरही निकाल अवलंबून आहे. महाविकास आघाडी एकसंघ लढली तर बालदींना निवडणूक लढविताना प्रयास पडतील, हे नक्की. लोकसभेला मात्र येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना मताधिक्य मिळाले होते.

पेणमध्ये विद्यमान आ. रवींद्र पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे कुणाला उभे केले जाते, याबाबत उत्सुकता आहे. माजी आ. धैर्यशील पाटील यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश, नंतर त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून झालेली बिनविरोध निवड यामुळे भाजपची ताकद सध्या पेणमध्ये वाढलेली आहे. या मतदार संघातून शेकापतर्फे प्रमोद ऊर्फ पिंट्याशेट पाटील की शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन यांना उमेदवारी दिली जाते, हे पाहणे उचित ठरेल. दरम्यान येथे लोकसभेला खा. सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळाले होते.

अलिबागमध्ये विद्यमान आ. महेंद्र दळवींच्या विरोधात शेकापतर्फे चित्रलेखा पाटील की पंडित पाटील अथवा अॅड. आस्वाद पाटील हे निश्चित झालेले नाही. तर काँग्रेसतर्फे अॅड.प्रवीण ठाकूर यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपतर्फे दिलीप भोईर यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे अलिबागमध्ये दुरंगी की तिरंगी लढत होते, याबाबतही उत्सुकता लागली आहे. दरम्यान, येथे लोकसभेला खा. सुनील तटकरे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते.

श्रीवर्धनमध्ये विद्यमान आमदार तथा महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण असेल, याकडे महाविकास आघाडीची शोधमोहीम सुरू झालेली आहे. शिवसेनेच्या प्रमोद घोसाळकर यांनी, युतीधर्म पाळा, अन्यथा आम्हाला श्रीवर्धनमधून उभे रहावे लागेल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गट वा शिवसेना ठाकरे गट येथे उमेदवार देण्याची शक्यता आहे. दरम्यान येथे लोकसभेला खा. सुनील तटकरे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते.

महाडमध्ये विद्यमान आ. भरत गोगावले विरुद्ध ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यात लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना अपेक्षित मताधिक्य मिळवून देण्यात गोगावले यांना आलेले अपयश हे डोळेझाक करून चालणार नाही. त्यामुळे महाडमध्ये चुरस होणार, हे नक्की आहे.

कर्जत विधानसभेत मात्र यावेळी कडवी लढत अपेक्षित आहे. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे आमदार असले, तरी त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या सुधाकर घारे यांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. याशिवाय ठाकरे गटाचे नितीन सावंत, भाजपवासी झालेले माजी आ. सुरेश लाड यांच्याही उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे काय निकाल लागेल, हे सांगणे तसे अवघडच आहे. दरम्यान कर्जतमध्ये लोकसभेला महायुतीचे खा. श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळाले होते.

खा. सुनील तटकरे हे लोकसभेवर विजयी झाल्याने त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या निर्णयावरच महायुतीचे उमेदवार निश्चित होऊ शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT