जयसिंगपूर : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधत शक्तीप्रदर्शन करून शिरोळ विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज निवडणूक विभागात दाखल केला. दरम्यान, गुरुवारी ९ इच्छुक उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडून घेतले. आजअखेर ४५ इच्छुक उमेदवारांनी ५४ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली.
गुरुवारी अर्ज घेतलेल्यांमध्ये छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, भाजपचे अॅड. सुशांत पाटील, बाळासाहेब कांबळे, सुनीलकुमार पाटील, मुकुंद सावगावे, माजी आमदार उल्हास पाटील, सुनील पाटील, महेश पाटील, राजू मदने, सतीश नलवडे यांनी निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवसा अखेर ४५ इच्छुक उमेदवारांनी ५४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरला नसतानाही माजी आमदार उल्हास पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर, महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतरच काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिरोळ येथील तहसिल कार्यालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.