बारामतीः राजकारणाचं आम्हाला देणे घेणे नाही, शरद पवार हेच आमच्यासाठी पांडुरंग आहेत. असं म्हणत राज्यभरातील विविध जिल्ह्यातून अनेक नागरिक पाडव्याच्या दिवशी सकाळपासूनच गोविंद बागेच्या प्रवेशद्वारावर थांबले होते. सकाळी साडेसहा वाजता अकोल्यापासून इंदापूर पर्यंत विविध भागातून आलेले जेष्ठ नागरिक, महिला, युवक, राजकीय पदाधिकारी बारामतीतील गोविंद बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी आले होते.
मागील वर्षीच्या पाडव्याला झालेल्या गर्दीपेक्षा यावर्षी झालेली गर्दी अधिक होती. राज्याच्या विविध भागातून विविध जिल्ह्यातून युवक, युवती, जेष्ठ नागरिक, राजकीय पदाधिकारी या ठिकाणी आले होते. राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये खासदार निलेश लंके, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी जाहीर झालेले उमेदवारही होते.
पहाटेपासूनच राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी गोविंद बागेसमोर थांबले होते. सकाळी सात वाजता त्यांना प्रवेशद्वारातून आत सोडण्यात आले आणि साडेसात वाजता शरद पवार हे व्यासपीठावर आले. त्यांनी या सर्व नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. यावर्षी पहिल्यांदाच बारामतीत दोन ठिकाणी स्वतंत्ररित्या पाडव्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी पाडवा आयोजित करण्यात आला होता. एकाच वेळी बारामतीत दोन ठिकाणी पाडवा असल्याने कुठे गर्दी होणार याची उत्सुकता होती.
सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहाकाळ या विधानसभा मतदारसंघातून अनेक जण शरद पवारांना भेटण्यासाठी आले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लोकांचा यामध्ये सहभाग होता. अजित पवारांनी आर.आर.पाटील यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल या नागरिकांनी खंत व्यक्त केली. व गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी येत आहोत. हाच आमचा पांडुरंग आहे. हाच आमचा राजकारणातील पांडुरंग आहे. असे म्हणत शरद पवारांचे विचाराचे सरकार राज्यात आले पाहिजे. असे मत या नागरिकांनी व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या समवेत आणलेले "इडा पिडा टळु दे" शरद पवार साहेबांचे राज्य येऊ दे.. अशा स्वरूपाचे फलक या ठिकाणी घेऊन नागरिक आले होते.