पुढारी ऑनलाईन डेस्क : कुडाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कुडाळ विधानसभा प्रचार प्रमुख माजी खा. निलेश राणे बुधवारी सायंकाळी ४ वा. कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. (Maharashtra Assembly Polls)
माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खा. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे गेले दीड-दोन वर्ष कुडाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढविण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांच्या पदाधिकारी, समर्थक कार्यकर्त्यांकडून सुध्दा त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र भाजप की शिवसेना? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मंगळवारी निलेश राणे यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी संध्याकाळी ४ वाजता शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश करणार आहेत.
कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान आ. वैभव नाईक हे रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांना तुल्यबळ असलेला उमेदवार निलेश राणे यांच्या रूपात देणे आवश्यक असल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून निलेश राणे यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरविले आहे.