सिन्नर : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आता जागावाटपाचा तिढा सोडविण्यात नेतेमंडळी मश्गूल झालेली आहेत. सिन्नर विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब मानले जात आहे. तथापि, महाविकास आघाडीत अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे आमदार कोकाटे यांच्यासमोर तगडा उमेदवार कोण? या प्रश्नाच्या उत्तराकडे सबंध तालुकावासीयांचे लक्ष लागलेले दिसते.
महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट अथवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्हीपैकी एका पक्षाला जागा सुटण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही पक्षांत इच्छुकांमध्ये कमालीची स्पर्धा दिसून येते. त्यामुळे विद्यमान स्थितीत संभ्रमावस्था आहे. मध्यंतरी नाशकात आलेल्या खासदार संजय राऊत यांच्यासमवेत सिन्नरमधील ठाकरे गटाच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात आम्ही आयात उमेदवार खपवून घेणार नाही, अशी परखड भूमिका संबंधित कार्यकत्यांनी खासदार राऊत यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे संवाद मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सिन्नरला येऊन गेले. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या. मात्र बाहेरचा उमेदवार लादू नका, अशीच भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे आतून काम करणाऱ्यांना आतूनच इकडे घेऊन या, असे वक्तव्य केले.
होते. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला होता. खासदार वाजे यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांनी चहापान केले होते. तेथेही कार्यकत्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकत्यांचीच री ओढली. त्यामुळे बरिष्ठांना निर्णय घेताना शंभरदा विचार करावा लागेल, असे दिसते. इच्छुकांचे दौरे, भेटीगाठी, मुलाखती असे सगळे असताना खासदार वाजे यांनी अद्यापपर्यंत मौन बाळगलेले बघायला मिळते. महाविकास आघाडीत सिन्नरची जागा ठाकरे गटाला सोडावी किंवा काय, याबाबतचे अधिकृत भाष्य समोर आलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा मशाल की, तुतारीला तसेच उमेदवार कोण असेल, हे गुलदस्त्यात आहे. एकूणच महाविकास आघाडीचा उमेदवार ठरविण्यात खासदार वाजे यांचा कौल महत्त्वाचा ठरणार असल्याचेच दिसते.
ठाकरे गटातून बाळासाहेब वाघ, भारत कोकाटे, डॉ. रवींद्र पवार, राजेश गडाख, अरुण वाघ, तर शरद पवार गटाकडून कोंडाजी मामा आव्हाड, राजाराम मुरकुटे, अॅड. संजय सोनवणे यांनी उमेदवारीसाठी दावा केला असल्याचे दिसत आहे.
राजाभाऊ वाजे लोकसभेत गेल्याने सिन्नर विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत, आमदार कोकाटे यांना टक्कर देऊ शकेल अशा उमेदवाराचा शोध घेताना युवा नेते उदय सांगळे यांचे नाव अग्रभागी येते. मात्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतून त्यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. असे असले, तरी ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असून दोन-तीन दिवसांत त्यांना प्रवेशाचे आवतन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि, महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी स्वकीयांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास उदय सांगळे यांना अन्य पर्याय शोधावा लागेल. कारण पक्ष अथवा अपक्ष, यंदाची विधानसभा लढायचीच, असा चंग त्यांनी बांधलेला आहे. असे झाले, तर सिन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे, महाविकास आघाडी देईल तो उमेदवार आणि उदय सांगळे असा तिरंगी सामना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.