नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना नाशिक जिल्ह्यातील मित्रपक्षांच्या तीन मतदारसंघांवर ठाकरे गटाने दावा केल्याने महाविकास आघाडीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने गुरूवारी (दि.१७) सायंकाळी आपल्या संभाव्य जागांवरील प्रबळ दावेदारांना 'मातोश्री'वर पाचारण करत चाचपणी केली असून दावा केलेल्या जागांवर ठाकरे गटाकडून परस्पर उमेदवार घोषित होण्याच्या आशंकेने महाविकास आघाडीतील घटक पक्ष अलर्ट झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी आता जेमतेम एक महिना उरला आहे. सत्तारूढ महायुती विरुध्द विरोधक महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होत आहे. अर्थात तिसऱ्या आघाडीचे आव्हानही या निवडणुकीत असणार आहे. या निवडणुकीसाठी युती-आघाडीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी(दि.१७) प्रसिध्द केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अन्य पक्षांकडून येत्या दोन-तीन दिवसात उमेदवार जाहीर केले जातील. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचाली गतिमान बनल्या आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी युध्दपातळीवर जोरबैठका सुरू असताना नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघावरून आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य, निफाड आणि देवळाली या तीन मतदारसंघांचा यात समावेश आहे. या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडे प्रबळ दावेदार उपलब्ध आहेत. मात्र हे तिनही मतदारसंघ मित्रपक्षांना सुटण्याची शक्यता असल्यामुळे ठाकरे गटातील इच्छूकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी प्रबळ दावेदारांना 'मातोश्री'वर पाचारण केले होते. या इच्छूकांना रात्री उशिरा झालेल्या भेटीत पक्षप्रमुखांकडून मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, चर्चेचा तपशील कळू शकला नाही.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला नाशिक पश्चिम, नांदगाव व मालेगाव बाह्य या तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. याखेरीज नाशिक मध्य, निफाड व देवळाली या तीन अतिरीक्त जागांवर ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे. नाशिक मध्य काँग्रेसचा पारंपरीक मतदारसंघ आहे. माजी आमदार वसंत गिते यांच्यासाठी हा मतदारसंघ ठाकरे गटाला हवा आहे. निफाड मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल कदम इच्छूक आहेत. देवळाली मतदारसंघही राष्ट्रवादीकडे असताना ठाकरे गटाच्या योगेश घोलप यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.