जगदीश गोडसे , जनरल सेक्रेटरी इंडिया सिक्युरिटी नोट प्रेस, नाशिक. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Nashik | नाशिक पूर्वमधून जगदीश गोडसे अपक्ष लढणार

Jagdish Godse : नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणार

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : नाशिक पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) उमेदवारी मिळण्याची पूर्ण शाश्वती असलेले प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांचे नाव शेवटच्या क्षणी रद्द होऊन भाजपमधून आलेल्या गणेश गिते यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कामगार, कष्टकरी, शेतकरी, सामान्य वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माझ्यासारख्या निष्ठांवताला पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शरद पवारांवरील निष्ठा हरली आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पैशाची ताकद जिंकली, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जगदीश गोडसे यांनी व्यक्त करत, आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली.

नाशिक रोड येथील आयएसपी, सीएनपीमध्ये जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगार पॅनलने गेल्या २०१२ पासून प्रेसमध्ये एकहाती सत्ता राखली आहे. दिवंगत प्रेस कामगारांच्या वारसांची नियुक्ती, सातवा वेतन आयोग, रिटायर्डमेंट मेडिकल पॉलिसी आदी महत्त्वाचे प्रश्न गोडसे यांनी मार्गी लावले. आंतरराष्ट्रीय युनिग्लोबल कामगार संघटनेवर उपाध्यक्षपदी निवड झालेल्या जगदीश गोडसे यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी दोन वर्षांपासून केली होती. त्यासाठी मतदारसंघात व्यापक दौरे करत मेळावे घेतले होते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस जिमखाना येथे हिंद मजदूर सभेचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम गोडसे यांनी घेतला होता. पवार यांनी गोडसे यांच्या घराच्या वास्तुशांतीला आवर्जून हजेरी लावली होती. त्यामुळे गोडसे यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती.

गोडसे यांनी पवारांशी चांगला संपर्क ठेवला होता. पवार यांनीही गोडसे यांना नाशिक पूर्वमधून उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. तसे स्पष्ट संकेत देत मतदारसंघात कामाला लागण्याचे निर्देशही दिले होते. गोडसे यांनी दोन वर्षांपासून कामांचा, मेळाव्यांचा, कार्यक्रमांचा धडाका लावला होता. जगदीश गोडसे यांनीच उमेदवारी करावी, त्यांना आम्ही विजयी करून देऊ, अशी हमी नागरिकांनी दिली आहे.

निष्ठा हरली, पैसा जिंकला

मुंबईतील भेटीबाबत बोलताना गोडसे म्हणाले की, माझी शरद पवार आणि पक्षावर अजूनही निष्ठा आहे. मात्र, शेवटच्या क्षणी झालेल्या घडामोडींमुळे प्रामाणिक निष्ठा हरली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पैशाची ताकद जिंकली, असे मला खेदाने नमूद करावेसे वाटते. आपण पवार यांची मुंबईत भेट घेतली, तेव्हा पक्षाच्या उमेदवारीचा एबी फाॅर्म जगदीश गोडसे यांनाच देऊन टाका, अशी स्पष्ट सूचना शरद पवार यांनी जयंत पाटील यांना सर्वांसमक्ष केली होती. मात्र, त्यांचा आदेश झिडकारून दुसऱ्यालाच उमेदवारी देण्यात आली. यावरून पैशाची ताकद चालली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तथापि, समर्थकांनी निराश होऊ नये. अपक्ष म्हणून विधानसभा निवडून लढणार असून जनता मला नक्कीच विजयी करेल, असा विश्वास जगदीश गोडसे यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT