नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ
नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघात मतदान केंद्रांवर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने रांगा लगल्या होत्या. Pudhari News network
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Nashik Assembly Polls | नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघात महिलांचा उत्साह

Nashik East Assembly Constituency: किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. २०) पैसे वाटपाचा किरकोळ वादवगळता दिवस भर शांततेत मतदान पार पडले. यावेळी पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा उत्साह अधिक होता. मतदार संघात सायंकाळी सहापर्यंत 00.00 टक्के मतदान पार पडले असून रात्री उशिरापर्यंत काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या.

विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील केंद्रांवर सकाळी सातपासून रांगा लागल्या. थंडीचा कडाका जाणवत असतानाही मतदारांचा उत्साह तसुभरही कमी झालेला नव्हता. म्हसरुळ व मखमलाबाद गाव येथील केंद्र, देवधर हायस्कूल, पेठफाटा येथील उन्नती हायस्कूल, दसक-पंचक, नाशिकरोड परिसरातील केंद्रांमध्ये उत्साह होता. यावेळी विशेषत: महिला तसेच ज्येष्ठ मतदारांची संख्या लक्षणीय होती. मतदारसंघात सकाळी ९ पर्यंत ६.४३ टक्के नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ११ पर्यंतही आकडेवारी १३.९ टक्के, दुपारी एकला २८.३४ तसेच तीन वाजता ३८.९४ टक्के मतदारांनी हक्क बजावला.

फुलेनगर येथील वैदूवाडीत दुपारच्या सुमारास एका उमेदवाराच्या कार्यकर्त्याला विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पैसे देताना पकडले. यावेळी वाद अधिक विकोपाला जाण्याचा शक्यता निर्माण झाली असताना पोलिसांनी हस्तक्षेप करीत पुढील अनर्थ टाळल्याचे समजते आहे. मतदारसंघात अन्यही काही केंद्रांवर किरकोळ स्वरुपाचे वादवगळता दिवसभर शांततेत मतदान पार पडले.

पोलिसांचा वॉच

नाशिक पूर्व मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्यात वादाचे प्रसंग निर्माण झाले. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासन पहिलेपासूनच अलर्ट मोडवर होते. पाेलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राला भेट देत सुरक्षेची पाहाणी केली. यावेळी मतदान केंद्रात तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना काही सूचनाही वरिष्ठांकडून करण्यात आल्या.

मे आय हेल्प यू!

नाशिक पूर्व मतदारसंघात मतदान केंद्रावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व आजारी मतदारांना केंद्रात आल्यावर मे आय हेल्प यू असे मंजुळ स्वर कानी पडत होते. यावेळी केंद्रात उपस्थित असलेले पोलिस, होमगार्डस‌् तसेच स्वयंसेवकांकडून ज्येष्ठ व दिव्यांगाना व्हिलचेअरद्वारे मतदान कक्षात ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध होती. तसेच आजारी मतदारांनाही मदतीसाठीचा हात पुढे येत हाेता. मतदानाच्या या उत्सवात केंद्रावर मिळणाऱ्या सुविधांमुळे मतदारदेखील भारावून जात होते.

नेते, पदाधिकाऱ्यांचा जोगवा

मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या समर्थकांनी मतदारांच्या सुविधेसाठी मतदान बुथची उभारणी केली. या बुथवर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. केंद्राबाहेर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी तसेच स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी नेते-पदाधिकाऱ्यांकडून केंद्रावर येणाऱ्या मतदारांना आपल्याच उमेदवारांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत हाेते.

नाश्ता, जेवणावर ताव

मतदान केंद्रात नियुक्त अधिकारी-कर्मचारी व पोलिसांना जागेवर नाश्ता तसेच जेवणाची सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले. तसेच मतदान केंद्राबाहेरील राजकीय पक्षांच्या बुथवर ही नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांनी फुड पॅकेटची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले. कार्यकर्त्यांनी पुरी-भाजी, मसालेभात, उपमा, पोळी-भाजी अशा विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.